बी-टाऊनचा खिलाडी मुलीसह वयोवृद्ध जोडप्याच्या घरात जाताच त्यांनी....

एकिकडे अक्षय कुमारच्या चित्रपटांच्या चर्चा सुरू असतानाच तो मात्र....   

Updated: Nov 1, 2019, 08:52 AM IST
बी-टाऊनचा खिलाडी मुलीसह वयोवृद्ध जोडप्याच्या घरात जाताच त्यांनी....  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार हा कायमच काहीतरी वेगळं करुन चाहत्यांचं लक्ष वेधत असतो. फक्त चाहतेच नव्हे, तर कलाविश्वातील सेलिब्रिटी मंडळीसुद्धा त्याच्या कृतींनी अनेकदा भारावलेले असतात. अशा या खिलाडी कुमारने पुन्हा एकदा चाहत्यांना आणि सेलिब्रिटींना धक्काच दिला आहे. बरं, यावेळी त्याची मुलगी नितारा हिसुद्धा त्याच्यासोबत होती. 

महाराष्ट्रातील एका खेडेगावातील वयोवृद्ध जोडप्याच्या घरी अक्षय गेला. यावेळी त्याच्यासोबत मुलगी निताराही होती. त्याने तिथे जाऊन पिण्यासाठी पाणी मागितलं. पण, त्या घरातील व्यक्तींनी अक्षय आणि त्याच्या मुलीला फक्त पाणीच दिलं नाही, तर गुळ- पोळी देऊन त्यांचं आदरातिथ्यही केलं. 

दैनंदिन जीवनातील याच अविस्मरणीय अनुभवाविषयी अक्षयने सोशल मीडिया पोस्टही लिहिली.  ज्यासोत त्याने दोन फोटो जोडले. यातील एका फोटोमध्ये तो मुलीसह खेड्यातील त्या घरात जाताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये त्याचं आदरातिथ्य करणारं जोडपंही दिसत आहे. 

'आजचा मॉर्निंग वॉक हा चिमुरडीसाठी (नितारासाठी) जीवनात बरंच काही शिकवणारा ठरला. पाणी पिण्यासाठी म्हणून आम्ही या वृद्ध जोडप्याच्या घरात गेलो. त्यांनी आमच्यासाठी गुळपोळी बनवली', असं त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलं. त्याने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनीच तो लाईक करत महाराष्ट्रातील आदरातिथ्याविषयीच्या त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. 

 
 
 
 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

'हाऊसफुल्ल ४' या चित्रपटाच्या यशानंतर आता अक्षय त्याच्या संपूर्ण कुटुंबासह सध्या महाराष्ट्रातील एका खेडेगावात सुट्टीसाठी गेला आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नाची आजी बेट्टी कपाडिया यांचा ८०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून ही मंडळी तेथे गेली आहेत. तेथील काही फोटो ट्विंकलनेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केले होते. पण, या साऱ्यामध्ये मन जिंकलं ते म्हणजे खिलाडी कुमारला गुळपोळी खाऊ घालणाऱ्या त्या आजी- आजोबांनी.