मुंबई : हिंदी कलाविश्वात काही कुटुंबांना प्रेक्षकांची अशी काही पसंती असते की, त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून अनेकांच्याच काही अपेक्षा असतात. असंच एक कुटुंब म्हणजे 'कपूर' कलाविश्वात या कुटुंबातील बऱ्याच पिढ्यांनी मोलाचं योगदान दिलं. मुळात ही बाब कोणीही नाकारली नाही. पण, याच आडनावामुळे काही आव्हानंही समोर होती, अशा आशयाचं वक्तव्य अभिनेता अनिल कपूर यांनी केलं.
निर्माते सुरिंदर कपूर आणि निर्मल कपूर यांचा मुलगा अशी ओळख असणाऱ्या अनिल कपूर यांनी 'वस्मा वृशाकम' या तेलुगू चित्रपटातून अभिनेता म्हणून कलासृष्टीत पदार्पण केलं. पृथ्वीराज कपूर आणि सुरिंदर कपूर हे नात्याने भाऊ होते. हे 'तेच' कपूर आहेत, ही बाबसुद्धा अनेकांना प्रथमत: खरी वाटत नाही. पण, हेच सत्य आहे.
कुटुंबातील व्यक्तींमुळे आणि 'कपूर' या आडनावामुळे उभी राहिलेली प्रतिमा, अपेक्षांचं ओझं या अनिल कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्यालाही आल्या होत्या. याच ओघाओघाने आलेल्या गोष्टींमध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करण्याचा आणि एक गंभीर, वैचारिक भूमिका साकारण्याचा निर्णय अनिल कपूर यांनी घेतला होता. आपल्याकडे 'कपूर' कुटुंबातील यशस्वी अभिनेत्यांप्रमाणे 'चार्म' नसल्याचं म्हणत त्यांनी हा निर्णय घेतल्याचा उलगडा गोव्यात सुरु असणाऱ्या IFFIमधील एका सत्रात केला.
कारकिर्द सुरु केली तेव्हा 'कपूर' हे आडनावच माझ्यासाठी मोठ्या तोट्याचं होतं, असं म्हणत सर्व कपूर जे करत आहेत ते काही आपण करायचं नाही या निर्णयावर आपण पोहोचल्याचं ते म्हणाले. 'कपूरियत' न करण्याचा निर्णय मी घेतला. या ठिकाणी स्वत:ची वाट स्वत:च तयार करत स्वत:चं स्थान निर्माण करण्याचा विचार केला. मी श्याम बेनेगल, मृणाल सेन, एम.एस. सथ्यू आणि मणी रत्नम यांची भेट घ्यायचो. हे ते चित्रपट निर्माते- दिग्दर्शक होते जे सच्चे, गंभीर आणि वैचारिक चित्रपट साकारत होते. त्यामुळे मी असाच अभिनेता होण्याचं ठरवलं जो मी आज आहे', असं कपूर म्हणाले.
अरेच्चा! ही तर हुबेहूब मधुबाला....
कारकिर्दीत घेतलेल्या या निर्णयानंतर आपण तोंडघशी पडण्यासाठी, लोकांची खिल्ली सहन करण्यासाठीही तयार असल्याचं त्यांनी म्हटलं. सातत्याने चालत आलेल्याच धाटणीचा एखादा चित्रपट मी साकारला असता तर, या ठिकाणी आपल्याला तग धरता आला नसला, असं म्हणत पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर किंबहुना रणबीर कपूरही जे काम करत आहेत त्यात त्यांना मिळालेला वारसा हा नैसर्गिक आहे. ते उत्तमच काम करतात, त्यांच्या कलाकृती अद्वितीय आहेत. पण, मुळात आपल्यात तसा 'चार्म' नसल्याची बाब योग्य वेळी हेरतच आपण या निर्णयावर पोहोचल्याचंही कपूर म्हणाले.
'मी जेव्हा झोपी जातो, तेव्हा मला मोठा कलाकार होण्याची स्वप्न येत नाहीत. माझ्या स्वप्नात काही पात्र येतात. मला कधीच पैसा, मोठं घर किंवा प्रसिद्धी नको हवी होती. मी चांगल्या भूमिका साकारल्या तर प्रेक्षकांचं प्रेम मला मिळेल हे मला ठाऊक होतं. आतापर्यंतच्या वाटचालीच मी याच मार्गावर चाललो आहे', असं म्हणत जणू अनिल कपूर यांनी नव्या जोमाच्या कलाकारांना एक महत्त्वाचा संदेशच दिला.
एक अभिनेता म्हणून आपली निवड अनेकदा चुकलीही. ही बाब स्वीकारत आपण घेतलेल्या या धोकादायक निर्णयांचं फळ मिळाल्याचं समाधान असल्याचंही त्यांनी न विसरता सांगितलं.