मुंबई : कला जगतामध्ये प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारं एक नाव म्हणजे गायक, लेखक, अभिनेता आणि दिग्दग्शक पियुष मिश्रा यांचं. प्रत्येक पिढी या कालाकारावर भाळली. कोणी त्यांच्या आवाजवर, कोणी त्यांच्या शब्दावर कोणी अभिनयावर, कोणी कवितांवर तर कोणी एक व्यक्ती म्हणून पियुष मिश्रा यांच्यावर प्रेम केलं.
लोकप्रियतेपर्यंतचा त्यांचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता. मुळात गरीबी तर होतीच , पण कलेशी कुटुंबातील फार कोणाचा थेट संबंधच नव्हता.
इयत्ता दहावीमध्ये असताना प्रियाकांत शर्मा या मुलाला नवी ओळख मिळाली, ती म्हणजे पियुष मिश्रा या नावाची.
आत्यानंच त्यांना दत्तक घेतलं. 1983 ते 1986 दरम्यान मिश्रा यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून पदवी शिक्षण घेतलं. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं.
बरेच मित्रही जोडले. पण, त्यांची एक सवय मात्र अनेकांनाच खटकत होती. ती म्हणजे अती मद्यपानाची.
1995 मध्ये जेव्हा त्यांचं लग्न तामिळ आर्किटेक्ट प्रिया नारायणनशी झालं तेव्हा अनेकांनाच वाटलं की, त्यांच्यात सकारात्मक बदल होतील.
एका मुलाखतीत त्यांनी ही बाब स्पष्ट केली होती. की, मद्य हा केवळ एक बहाणा. पण, नैतिकृष्ट्यात मी ढासळलो होतो, पत्नी- मुलं कशाचीच चिंता मला नव्हती.
पियुष यांनी लग्नाआधी एका मुलीला पळवून आणलं होतं. पुढे त्याच मुलीशी त्यांनी लग्न केलं.
ही मुलगी म्हणजेच प्रिया. त्यावेळी पियुष यांच्या हाताशी काम नव्हतं. पण, तरीही प्रियानं त्यांची साथ देण्याचा निर्णय़ घेतला.
लग्नानंतर कित्येक वर्षे घरखर्च प्रियाच पाहत होती. पुढे त्यांना काम मिळालं पण सवयी मात्र बदलल्या नाहीत.
सरतेशेवटी प्रियानं त्यांना एका संस्थेमध्ये पाठवलं. जिथे त्यांच्याच काही बदल होण्यास सुरुवात झाली. ज्यानंतर ते पत्नी आणि मुलांसोबत गुण्यागोविंदानं राहू लागले.
एका सवयीनं पियुष मिश्रा यांच्या जीवनात उलथापालथ केली आणि ती सवय दूर करताच त्यांना स्वत:ला बदल जाणवू लागले.
मिश्रा यांच्या लेखणीतून कैक नाटकं साकारली गेली. 'गँग्स ऑफ वासेपुर', 'गुलाल', 'लाहोर', 'टशन', 'आजा नचले', मधील गीतलेखन त्यांनीच केलं.
'मकबूल', 'गुलाल', 'तेरे बिन लादेन', 'लफंगे परिंदे', 'दॅट गर्ल इन येलो बूट्स', 'रॉकस्टार', 'गँग्स ऑफ वासेपुर', 'तमाशा', 'पिंक', 'संजू', या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
तर, 'लाहोर', 'अग्निपथ', 'द लेजेंड ऑफ भगत सिंग' या चित्रपटांमध्ये त्यांनी संवादलेखनही केलं.
बहुआयामी कारकिर्द असणाऱ्या या कलाकाराबद्दल बोलावं तितकं कमी. तुम्हाला त्यांचं कोणतं रुप सर्वाधिक भावलं?