गेल्या काही वर्षांपासून पौराणिक विषयांवर अनेक चित्रपट बनवण्यात आले. 'रामायण', 'महाभारत' यावर आतापर्यंत बनवलेले बहुतांश चित्रपट आणि मालिका हिट ठरल्या. या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. रामायणावर आधारित चित्रपटाची घोषणा झाली की त्यात प्रभू श्रीराम, सीता, हनुमान आणि रावण या भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असतं. पण तुम्हाला माहितीये का, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्याची संधी चालून आली होती. पण त्यांच्या भावामुळे त्यांना ही संधी गमवावी लागली.
सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खानने औजार या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. पण त्यापूर्वी जवळपास तीन वर्षांपासून सोहेल खानने रामायणावर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या शूटींगलाही सुरुवात करण्यात आली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात सलमान खान हा प्रभू श्री रामांची भूमिका साकारणार होता. तर अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही सीतेच्या भूमिकेत झळकणार होती. पण ऐनवेळी अभिनेत्री पूजा भट्टची या चित्रपटात एंट्री झाली. पूजा भट्टसोबत या चित्रपटाचे 40 टक्के शूटींगही झाले होते. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान हा रामाची वेशभूषा करुन, हातात धनुष्य घेऊन ठिकठिकाणी प्रमोशन करत होता.
पण अचानक अभिनेता सोहेल खान आणि पूजा भट्ट हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगू लागली. त्यामुळे संपूर्ण चित्रपट अर्धवट राहिला. रामायणावर आधारित चित्रपटाची घोषणा केल्यानंतर त्याच्या शूटींगदरम्यान सोहेल खान आणि पूजा भट्ट यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्याचाच परिणाम या चित्रपटावर झाला, असे बोललं जातं.
काही मीडिया रिपोर्टसनुसार, पूजा भट्टने एका मुलाखतीत सोहेल खानसोबतच्या लग्नावर भाष्य केले होते. पूजा भट्ट आणि सोहेल खान लग्न करणार होते. पण जेव्हा याची माहिती त्यांचे वडील अभिनेते सलीम खान यांना मिळाली, तेव्हा त्यांनी हे नाते पुढे नेऊ नका, असा इशारा त्यांना दिला. यानंतरही सलमान खानने मध्यस्ती करत हे प्रकरण शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला. पण पूजा भट्टला खान कुटुंबियांची विचारसरणी आवडली नाही. त्यामुळेच पूजाने हा चित्रपट अर्धवट चित्रीकरण करुन सोडला.
पूजाने या चित्रपटाचे शूटींग जवळपास 40 टक्के केले होते. पण तिने हा चित्रपट अर्धवट सोडल्याने सोहेल आणि पूजा यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाला. त्यामुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही आणि याच कारणाने अभिनेता सलमान खानला प्रभू श्री रामांची भूमिकेत पाहायचे अनेकांचे स्वप्न हे फक्त स्वप्नच राहिले.