मुंबई : प्रेमात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सारं जग म्हणजे जणू एक सुंदर स्वप्नच असतं. त्यामुळं आपल्या आयुष्यातील कोणा एका खास व्यक्तीसाठी सारं जग जिंकण्याच्या आणाभाका अगदी सहजपणे घेतल्या जातात. इथं मुद्दा असा की, यावेळी वास्तविकता दूरच असते.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आपला ठसा उमटवणारा सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी हासुद्धा असाच प्रेमात आकंठ बुडालेला.
अहाननं त्याच्या जीवनातील एका खास व्यक्तीसाठी म्हणजेच प्रेयसीसाठी जे पाऊल उचललं होतं, ते इतर कोणीही करताना दहा वेळा विचार करेल.
गेल्या काही दिवसांपासून अहान त्याच्या आगामी चित्रपटाची प्रसिद्धी करताना दिसला. ज्यावेळी एके ठिकाणी त्याला तुझ्या जीवनातील सर्वात थरारक आणि भीतीदायक अनुभव कोणता होता असा प्रश्न विचारण्यात आला.
सर्वात भीतीदायक अनुभवाबाबत सांगताना प्रेयसीच्या वाढदिवसाच्या क्षणाची एक आठवण सांगितली.
'हा किस्सा माझ्या प्रेयसीच्या वाढदिवसाच्या क्षणाचा होता. त्यावेळई मला आज हे करायचंच आहे असाच विचार करुन मी थेट विमानातून खाली उडी मारली होती.'
स्कायडायव्हिंगच्या क्षणाचा हा अनुभव अहाननं शेअर केला. प्रेमासाठी वाटेल ते करणाऱ्या अहानचं हे बोलणं सर्वांच्याच भुवया उंचावून गेलं.
प्रेयसी किंवा प्रियकराला आनंद देण्यासाठी अनेकदा काहीतरी हटके गोष्टी करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण, अहानची ही कृती पाहता, 'ऐसी दिवानगी देखी नही कभी.. ' अशीच प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे.