मुंबई : Bollywood actor sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पाटणा पोलिसांतील अधिकारी विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन केल्यानंतर आता, मुंबई महानगरपालिका बिहारमधून आलेल्या आणखी चार पोलीस अधिकाऱ्यांच्या मागावर आहेत, जे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर तिवारी यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत बिहार पोलीसांचं पथक या प्रकरणाच्या तपासासाठी दाखल झालं. सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबईत आलेल्या सर्व बिहार पोलिसांना महानगरपालिका होम क्वारंटाईन करण्याच्या बेतात आहेत. पण, अद्यापही कोणा एका अज्ञात स्थळी असल्यामुळं बिहार पोलिसांच्या वास्तव्याचं ठिकाण मात्र कळू शकलेलं नाही.
दरम्यान, रविवारी तिवारी याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवत असतानाच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना होम क्वारंटाईन होण्याची विचारणा करण्यात आली. ज्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात आला. सध्याच्या घडीता तिवारी हे एका अतिथीगृहात असून तेथून बाहेर पडण्याची त्यांना अनुमती नाही.
तिवारी यांनी नियमांचं उल्लंघन करत बाहेर येण्याचा प्रयत्न केल्यास, हे लॉकडाऊनच्या नियमांविरोधा जाणं निरीक्षणास येईल आणि महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांच्या नावे एफआयआर दाखल करण्यात येऊन पुढील कारवाई करण्यात येईल. त्यामुळं आता मुंबईमध्ये सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन अनेक घडामोडीनी वेग पकडल्याचं स्पष्ट दिसत आहे.