मुलगा की मुलगी? गरोदर अभिनेत्रीकडून होणाऱ्या बाळाविषयी मोठा खुलासा

'जेंडर रिव्हिलिंग पार्टी'मध्ये तिने याविषयी माहिती दिली 

Updated: Aug 27, 2019, 01:02 PM IST
मुलगा की मुलगी? गरोदर अभिनेत्रीकडून होणाऱ्या बाळाविषयी मोठा खुलासा
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : मॉडेलिंग क्षेत्रात नावारुपास आल्यानंतर अभिनय विश्वाकडे वळलेल्या ऍमी जॅक्सन हिने काही दिवसांपासून या क्षेत्रापासून दुरावा ठेवला आहे. यामागचं कारण म्हणजे ऍमीचं गरोदरपण. काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍमीने तिच्या गरोदरपणाची माहिती दिली. ज्यानंतर याच माध्यमातून ती चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 

गरोदरपणातील प्रत्येक दिवसाचा आनंद घेणाऱ्या ऍमीने आता आणखी एक पोस्ट करत पुन्हा एकदा सर्वांनाच आनंदाची बातमी दिली आहे. आपण एका मुलाला जन्म देणार असल्याचं तिने जाहीर केलं आहे. 

'जेंडर रिव्हिलिंग पार्टी'मध्ये तिने ही गोड बातमी दिली. ज्याचा व्हिडिओही तिने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळाविषयी सांगताना ऍमीचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार यांच्या '२.०' या चित्रपटानंतर ऍमी रुपेरी पडद्यावर आलेली नाही. पण, सध्या मात्र ती या झगमगाटापेक्षा खासगी आयुष्यातील या खास क्षणांमध्येच रमली आहे असं म्हणायला हरकत नाही. 

दरम्यान, बाळाविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती सर्वांना सांगण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यातही ऍमिचा हटके आणि तितकाट स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला. या महत्त्वाच्या दिवसासाठी तिने फिकट निळ्या (आकाशी) रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसला प्राधान्य दिलं होतं. ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं. ऍमी कायमच तिच्या पोस्टच्या माध्यमातून नवनवील लूकमध्ये समोर आली आहे. गरोदरपणातही तिने हा स्टायलिश अंदाज काही दूर सारलेला नाही हे खरं.