First Look : वायुदलातील पहिल्या महिला वैमानिकाच्या रुपातील जान्हवीला ओळखलं का?

जाणून घ्या त्या वैमानिकेविषयी 

Updated: Dec 26, 2018, 02:06 PM IST
First Look : वायुदलातील पहिल्या महिला वैमानिकाच्या रुपातील जान्हवीला ओळखलं का?  title=

मुंबई : यंदाच्या वर्षाप्रमाणेच येणारं वर्ष म्हणजेच २०१९ हे वर्षसुद्धा नव्या आणि जोमाच्या कलाकरांच्या कलागुणांना वाव देणारं ठरणार आहे. नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या आगामी चित्रपटातील  फर्स्ट लूक पाहून असं म्हणणं वावगं ठरणार नाही. धडक या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या जान्हवीच्या वाट्याला एक बायोपिक आला असून, तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केल्याचं कळत आहे. 

भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी तिची वर्णी लागली आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या याच आगामी चित्रपटातील लूक व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जान्हवी वायूदलाच्या गणवेशात दिसत असून, तिचा हा लूक अत्यंत लक्षवेधी ठरत आहे. 

१९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान जखमी सैनिकांना कारगिल क्षेत्रातून सुरक्षित स्थळी नेण्यासाठीच्या बचावकार्यात सक्सेना यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. यामध्ये त्यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहवैमानिक श्रीविद्या राजन यांना शत्रूच्या आक्रमणाचाही सामना करावा लागला होता. पण, यातूनही त्यांनी आपल्याला नेमून देण्यात आलेलं काम पूर्णत्वास नेत महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली. 

सक्सेना यांची हीच यशोगाथा चित्रपटाच्या माध्यमातून साकारली जाणार असून, त्यांची व्यक्तीरेखा साकारण्याची जबाबदारी जान्हवीने घेतली आहे. या बायोपिकव्यतिरिक्त जान्हवी एका ऐतिहासिक कथानकाला साद घालणाऱ्या चित्रपटातही झळकणार आहे. 

करण जोहरचं दिग्दर्शन असणाऱ्या तख्त या चित्रपटातून जान्हवी झळकणार असून, तिच्यासोबतच रणवीर सिंग, विकी कौशल, आलिया भट्ट, करीना कपूर खान, अनिल कपूर, भूमी पेडणेकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटातून झळकणार आहे.