मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी कमी होत असते. आपल्या आवडत्या कलाकारांच्या जीवनात नेमकं काय सुरु आहे, येत्या काळात ते कोणत्या नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत इथपासून बऱ्याच गंभीर मुद्द्यांवर सोशल मीडियावर चर्चा केली जाते. पण, अनेकदा याच सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींना काही अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये ते सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार होतात. या साऱ्याला अपवाद ठरतेय एक अभिनेत्री.
नेटकरी खिल्ली उ़डवत असताना थेट त्यांच्या ट्विटमधील व्याकरणाच्या चुका सुधारणारी ही अभिनेत्री आहे, रेणुका शहाणे. कायमच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली परखड मतं मांडणाऱ्या रेणुका शहाणे यांनी ट्विटरवर एका युजरची शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं.
dam actress म्हणून रेणुका यांचा उल्लेख करणाऱ्या नेटकऱ्याची चूक त्याच्या लक्षात आणत त्यांनी एक ट्विट केलं. ज्यामध्ये उपरोधिक सूर आळवत त्यांनी अफलातून अंदाजात त्या नेटकऱ्याला त्रिफळाचीत केलं असं म्हणायला हरकत नाही. ''तुम्हाला Damn म्हणायचं आहे का? कारण, Dam म्हणजेच धरणं, जी नदीवर बांधली जातात. वीजनिर्मितीमध्ये याचा वापर होतो. तू मला Dam / धरण तर म्हणत नाहीयेस ना? बरं माझी इच्छा असेल तरीही मला तसं होता येणार नाही. कारण या निर्जीव गोष्टी आहेत. Damn....! आता मी तुमच्या वाक्यातील चूक सुधारू? 'You are just a damn actress'. हो मी आहेच तशी...'', असं ट्विट शहाणे यांनी करत आपल्याच शैलीत त्या नेटकऱ्याची शाळा घेतली.
Do you mean "damn"? Dams are built over rivers, to harness electricity. You don't mean I'm a dam, right? Even if I wanted to be, I couldn't. They are non living things. Damn! Now may I correct your sentence? "You are just a damn actress" Yes I am! And I'm damn good! https://t.co/pJ3LSgUc04
— Renuka Shahane (@renukash) December 17, 2019
'तुमचं IT Cellच तुकडे-तुकडे गँग आहे; त्यांना आधी थांबवा'
सोशल मीडियावर नेटकऱ्याची शाळा घेणाऱ्या रेणुका यांनी काही दिवसांपूर्वीच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला होता. देशात शांतता आणि बंधुभाव जपण्याचा त्यांचा संदेश पाहत रेणुकाने त्यावर सडेतोड उत्तर देत तुमची IT Cellच या देशात तुकडे- तुकडे गँगचं काम करत आहे, घृणेची भावना पसरवत आहे असं ट्विट केलं होतं.