नवी दिल्ली : loksabha election 2019 रामपूर येथील प्रचारसभेत समाजवादी पार्टीचे नेते आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आझम खान यांनी केलेल्या अश्लील शेरेबाजीवर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असताना कलाविश्वातही त्यांचा तीव्र विरोध केला जात आहे. समाजवादी पार्टीतून भाजपमध्ये गेलेल्या जया प्रदा यांच्यावर टीका करतेवेळी रामपूरच्या प्रचतारसभेच आझम खान यांच्या वाणीवरचा ताबा सुटला. पण, आता मात्र त्यांना हे आक्षेपार्ह वक्तव्य चांगलंच महागात पडत आहे. एकिकडे खुद्द जया प्रदा यांनी आझम खान यांना आगामी निवडणुकीत पराभूत करण्याचा विडा उचलत त्यांना खुलं आव्हान देत आपला विरोध व्यक्त केला.
सोशल मीडियावर विविध मुद्दयांवर अगदी ठामपणे आपलं मत मांडणाऱ्या रेणुका शहाणे यांचं ट्विटही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शहाणे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातन खान यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
निवडणुकांसाठी आझम खानसारख्या व्यक्तींना तिकीट अर्थात उमेदवारीच दिली नाही पाहिजे, असं लिहित त्यांनी या ट्विटमध्ये अखिलेश यादव यांचाही उल्लेख केला आहे. 'विशेषत: महिलांविरोधातील शिवीगाळ आणि आक्षेपार्ह वक्तव्यांसाठी आझम खान यापूर्वीही दोषी असल्याचं पाहिलं गेलं होतं', ही बाब अधोरेखित करत शहाणे यांनी आझम खानविरोधात आवाज उठवला.
People like Azam Khan should not be given tickets by @yadavakhilesh He is a repeat offender in abusive comments especially against women. An FIR has been filed but will stringent action really be taken? He should not be allowed to fight this election! Shame!
— Renuka Shahane (@renukash) April 15, 2019
'खान यांच्या नावे अनेकदा एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. पण, त्यांच्यावर खरंच काही कारवाई करण्यात आली आहे का? त्यांना निवडणूक लझढण्याची परवानगीच दिली नाही पाहिजे कारण हे सर्व लज्जास्पद आहे.... ', असं लिहित शहाणे यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या आझम खानवर निशाणा साधला. फक्त रेणुका शहाणेच नव्हे तर, राजकीय आणि कलाविश्वातूनही अनेकांनीच त्यांच्या या अशा भाषेवर आक्षेप घेतला होता. आझम खान यांची एकामागून एक येणारी ही अशी वक्तव्य आणि त्यांच्याविरोधात असणारा सूर पाहता आता पक्षश्रेष्ठी त्यावर काही महत्त्वाचा निर्णय घेणार का याकडे अनेकाचं लक्ष आहे.