close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धाची एक्झिट

आता 'ही' अभिनेत्री साकारणार सायनाची भूमिका 

Updated: Mar 15, 2019, 11:29 AM IST
...म्हणून सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धाची एक्झिट

मुंबई : विविक्ष क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या काही व्यक्तिमत्वांचा जीवनप्रवास चित्रपटांच्या माध्यमातून आजवर अनेकदा साकारण्यात आला. बॉलिवूडमध्ये स्थिरावलेल्या बायोपिकच्या या ट्रेंडमध्ये सध्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या कारकिर्दीवरही प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटात सायनाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. किंबहुना चित्रपटासाठी तिने तयारीही सुरू केली होती, इतकच नव्हे तर तिच्या लूकवरुनही पडदा उचलण्यात आला होता. पण, यापुढे मात्र ती या चित्रपटाचा भाग नसणार आहे. 

'मुंबई मिरर'ने प्रसिद्ध केलेल्या ववत्तानुसार अनेक चित्रपटांचे प्रस्ताव, व्यग्र वेळापत्रक या कारणांमुळे आणि पुरेशा वेळेअभावी तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात श्रद्धा 'छिछोरे', 'स्ट्रीट डान्स 3डी', 'साहो', 'बाघी ३' या चित्रपटांतून झळकणार आहे. सध्या या चित्रपटांची तयारी सुरू असून, ती प्रत्येक प्रोजेक्टला पुरेसा वेळ देत आहे. पण, अनेक प्रयत्न करुनही सायना नेहवालच्या बायोपिकसाठी मात्र तिला पुरेसा वेळ देता आलेला नाही. ज्यामुळे अखेर नाईलाजाने तिला या प्रोजेक्टमधून काढता पाय घ्यावा लागला आहे. 

श्रद्धाने या बायोपिकला रामराम ठोकल्यानंतर परिणीती चोप्रा यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनीच याविषयीची माहिती दिली. 'या वर्षअखेरीस आम्हाला सायना... चं चित्रीकरण पूर्ण करायचं आहे. २०२० मध्ये चित्रपट प्रदर्शित होणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रोजेक्टमध्ये होणाऱ्या काही बदलांसह पुढे जाणं हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. परिणीतीचा चित्रपटाच्या टीममध्ये नव्याने प्रवेश झाल्याचा मला आनंदच आहे. सायनाने प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने, अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे तिची कारकिर्द साऱ्या जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत', असं भूषण कुमार म्हणाले. निर्मात्यांनी दाखवलेला विश्वास आणि चित्रपटाच्या कथानकाची ताकद या गोष्टी पाहता आता परिणीती बॅडमिंटनपटू सायनाची भूमिका कशी बजावते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.