मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमनित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांपैकीच एका कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी करण्यात आलं. यावेळी मोदींनी कलाविश्वातील मंडळींसोबत महात्मा गांधी यांचे खास विचार आणि त्या विचारांच्या आधारे कलाविश्वात सादर होणाऱ्या कलाकृती यांविषयी चर्चा केली.
सोबतच विविध कलाकृतींच्या माध्यमातून गांधीजींचे विचार कशा प्रकारे आणखी प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवता येतील याविषयी या कार्यक्रमात चर्चा झाल्या. यावएळी मोदींनी कलाकारांचं कौतुकही केलं. या खास समारंभाच्या निमित्तानेच एक व्हिडिओही प्रदर्शित करण्यात आला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या व्हिडिओमध्ये आलिया भटट्, रणबीर कपूर, सोनम कपूर, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, विकी कौशल आणि इतरही काही सेलिब्रिटी मंडळी दिसत आहेत.
अहिंसा, सत्य, सेवा, क्षमा, विचार अशा विविध घटकांना आणि गांधीजींच्या विचारांना या व्हिडिओतून अतिशय सुरेखपणे सादर करण्यात आलं आहे. बंदे मे था दम.... वंदे मातरम', या गाण्याची संथ धून व्हिडिओला खास जोड देत आहे. 'आप मुझे जंजीरों मे जकड सकते हैं.... यातना दे सकते हैं.... इस शरीर को नष्ट कर सकते हैं.... लेकीन आप कभी मेरे विचारों को कैद नही कर सकते....' या ओळींनी या व्हिडिओची सुरुवात होते. पुढे, त्यांच्या विचारांचे बहुविध पैलू पाहता येतात. जे सादर करताना सेलिब्रिटीही आपल्याला एक प्रकारे आश्वस्त करुन जातात. अवघ्या काही मिनिटांच्या व्हिडिओतून खूप काही शिकवून जातात.
दरम्यान, खुद्द पंतप्रधान मोदींकडूनच आयोजित केलेल्या या समारंभासाठी कलाविश्वातील तिन्ही खान मंडळी, कंगना राणौत, बोनी कपूर, अनुराग बासू, कपिल शर्मा अशा अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. ज्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले.