शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठी सरसावलं बॉलिवूड; 'या' कलाकारांनी केली मदत

बॉलिवूडमधील अनेक कलाकार शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

Updated: Feb 17, 2019, 05:23 PM IST
शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठी सरसावलं बॉलिवूड; 'या' कलाकारांनी केली मदत title=

मुंबई : मुंबई : १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्याचा देशाभरातून निषेध केला जात आहे. बॉलिवूडमधूनही हल्ल्याचा निषेध केला जात असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. 

बॉलिवूड दबंग सलमान खानने त्याच्या 'बिईंग ह्यूमन' संस्थेमार्फत शहीदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. सलमानने केलेल्या या मदतीसाठी गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सलमानचं कौतुक करत त्याला धन्यवाद दिले आहेत. 

गायक-अभिनेता दिलजीत दोसांजनेही शहीद सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. दिलजीतने शहीद जवानांच्या पत्नींना ३ लाख रूपयांची मदत केली आहे. दिलजीतने सीआरपीएफ वाईव्स वेलफेअर असोसिएशनला दिलेल्या मदतीचा स्नॅपशॉट शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने भावनिक पोस्टही लिहिली आहे. 

'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'चित्रपटाच्या टीमनेही शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. चित्रपटाचे निर्माते रौनी स्क्रूवाला यांनी आपल्या सोशल मीडियावरून जवानांच्या कुटुंबियांना १ करोड रूपयांची मदत केल्याची माहिती दिली.

बिग बी अमिताभ बच्चन यांनीही शहीद जवानांना ५-५ लाख रूपयांची मदत केली आहे.