'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर

प्रकृतीत बिघाड झाल्यामुळं त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Updated: Aug 11, 2020, 09:52 PM IST
'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर
संग्रहित फोटो

मुंबई : 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या विश्वात पदार्पण करणाऱ्या निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. दृश्यम, मदारी, फुगे आणि अशा इतरही चित्रपटांसाठी त्याची ओळख आहे. कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या दिग्दर्शकाच्या प्रकृतीच्या बातम्यांनी सध्या अनेकांना चिंतेत टाकलं आहे.

प्रकृतीत बिघाड झाल्यामुळं त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना काही काळापूर्वी Liver Cirrhosisचा त्रास होता. ज्यानंतर पुन्हा एकदा त्यांना हा त्रास सतावू लागला. 

'डोंबिवली फास्ट', या चित्रपटातून आपल्या दिग्दर्शन शैलीची वेगळी छाप सोडणाऱ्या निशिकांत कामत यांनी मुंबईतील बॉम्बस्फोटांवर आधारित चित्रपट साकारत 'मुंबई मेरी जान'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'भावेश जोशी' या चित्रपटातून त्यांचा अभिनय पाहता आला होता. तर, 'रॉकी हँडसम' या चित्रपटात त्यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका चर्चेचा विषय ठरली होती.