मुघलांना हादरवणाऱ्या थराराची गोष्ट; पाहा 'तान्हाजी'चा ट्रेलर

एक मराठा....... 

Updated: Nov 19, 2019, 02:41 PM IST
मुघलांना हादरवणाऱ्या थराराची गोष्ट; पाहा 'तान्हाजी'चा ट्रेलर  title=
tanhaji the unsung warrior

मुंबई : मुघल साम्राज्याला सुरुंग लावत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शूर मावळ्यांच्या साथीने कायमच त्यांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण केलं, स्वराज्याचा अभय दिलं. यातीलच एका असामान्य गाथेवर आणि पराक्रमावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. दिग्दर्शक ओम राऊतने शिवधनुष्य पेलत महाराजांच्या पराक्रमी मावळ्यांपैकी एक असणाऱ्या वीर तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. 

पराक्रमाची झलक पाहायला मिळत आहे ती म्हणजे 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर'च्या Tanhaji- The Unsung Warrior  ट्रेलरमधून. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. '४ फेब्रुवारी १६७०, एक असं सर्जिक स्ट्राईक, ज्यामुळे मुघल साम्राज्याला हादरा बसला....' अशा ओळी लिहित चित्रपटात तान्हाजींच्या भूमिकेत झळकणाऱ्या अजय देवगन याने ट्रेलर सर्वांच्या भेटीला आणला. 

कोंढाण्यावर परकीयांचा डोळा पडला तेव्हा नेमक्या कोणत्या रणनितीने शत्रूला दूर सारत एक असामान्य पराक्रम घडला, याचं प्रत्ययकारी रुप चित्रपटाच्या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तान्हाजीच्या रुपात दिसणारा अजय जितका प्रशंसेस पात्र ठरत आहे, तितकेच चित्रपटातील इतर कलाकारही लक्ष वेधून जात आहेत. सैफ अली खान, अभिनेत्री काजोल, शिवबांच्या भूमिकेत दिसणारा शरद केळकर, जिजाऊंच्या भूमिकेत दिसणाऱ्या पद्मावती राव, असे सर्वच चेहरे खऱ्या अर्थाने काही क्षणांसाठी एका वेगळ्या दुनियेत नेत आहेत. 

कडेकपारी आणि कातळ, खडकातून मावळे कशा प्रकारे परकीयांशी लढले होते याची झलक पाहत असताना चित्रपटाचं पार्श्वसंगीतही विशेष लक्ष वेधून जात आहे. एकंदरच ऐतिहासिक कालखंड साकारण्यासाठी दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत लक्षात येत आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या उत्सुकतेने आणि कुतूहलाने खऱ्या अर्थाने परमोच्च शिखर गाठलं आहे असं म्हणायला हरकत नाही.