मुंबई : हिंदी कलाविश्वात 'बेबी डॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री सनी लिओनीच्या वाट्याला फार कमी वेळात प्रसिद्धी आली असली तरीही तिला काही अडचणींचाही सामना करावा लागत आहे.
अडल्ट स्टार ते बी- टाऊनमधील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनीचा सोमवारी कर्नाटकातील बंगळुरू येथे मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला.
कर्नाटक वेदिक संघटनेच्या सदस्यांनी एकत्र येत सनीविरोधात घोषणाबाजी करत तिचा विरोध केला. संबंधित राज्यात सनीच्या प्रवेशावरुन आणि कन्नड चित्रपटातील तिच्या भूमिकेच्या मुद्द्यावरुन हा विरोध करण्यात आल्याचं कळत आहे.
कर्नाटक वेदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाऊन हॉल परिसरात एकत्र येत घोषणाबाजी करत सनीचा विरोध केला. यावेळी तिचे पोस्टरही जाळण्यात आले.
'वीरमहादेवी' या चित्रपटातील सनी लिओनीच्या भूमिकेचा या संबिधत संघटनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. याधीही तिला अशा प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, कन्नड संघटनांच्या या विरोधानंतरही सनी ३ नोव्हेंबरला त्या ठिकाणी पार पडणाऱ्या एका कार्यक्रमात ती सहभागी होणार आहे. त्यामुळे आता येत्या काळात हा विरोध शमणार की आणखी तीव्र होणार याकडेच सर्वाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.