मुंबई : कलाविश्वाकडून राजकारणाकडे वळलेल्या ज्येष्ठ अभिनेता रजनीकांत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. जम्मू- काश्मीर येथे लागू करण्य़ात आलेलं अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचंही त्यांनी स्वागत केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना या अतिशय महत्त्वाच्या अशा निर्णयासाठी शुभेच्छा देत त्यांनी या जोडीला कृष्ण- अर्जुनाची उपमा दिली.
'मिशन काश्मीरसाठी मी तुमचं अभिनंदन करतो. संसदेत तुम्ही केलेललं भाषण हे अद्वितीय होतं. अमित शाह आणि पंतप्रधान मोदी ही जणूकाही कृष्ण- अर्जुनाची जोडी आहे. कोणासाठी कोण आहे, हे ते अचूकपणे जाणतात', असं म्हणत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी थलैवा रजनीकांत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने 'लिसनिंग, लर्निंग एँड लिडींग' या पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. या पुस्तकात नायडू यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
असं असेल 'लिसनिंग, लर्निंग एँड लिडींग'...
अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार 'लिसनिंग, लर्निंग एँड लिडींग' अशा शीर्षकाच्या या पुस्तकात गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपतींच्या ३३० सार्वजनिक कार्यक्रमांची झलक पाहता येणार आहे. शिवाय यामध्ये नायडू यांच्या काही प्रमुख राजकीय कार्यक्रमांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये १९ देशांचे दौरे समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांनी संपादन केलेल्या गोष्टींचीही नोंद करण्यात आली आहे. पनामा, ग्वाटेमाला, कोस्टा रिका आणि माल्टा अशा देशांच्या दौऱ्यांवर जाणारे ते भारताचे पहिलेच उपराष्ट्रपती आहेत.