जम्मू-काश्मीरवर गायक कैलाश खेर यांची प्रतिक्रिया

कैलाश खेर यांनी एक कविता शेअर केली आहे.

Updated: Aug 5, 2019, 09:04 PM IST
जम्मू-काश्मीरवर गायक कैलाश खेर यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : आज जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आला. सरकारकडून घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयानंतर कलाविश्वातून अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. गायक कैलाश खेर यांनीही ट्विट करत या निर्णयाच्या स्वागतार्ह एक कविता शेअर केली आहे. 

कैलाश खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत, ७० वर्षांपूर्वी भारताच्या डोक्यावर लागलेला डाग आज पुसला गेल्याचं म्हटलं आहे. अखंड भारत असं आधी केवळ म्हटलं जात होतं, परंतु ते आज सार्थकी लागलं आहे. आता खरोखरचं भारत अखंड झाला आहे. एक झाला आहे, असं त्यांनी म्हटलंय.

जम्मू-काश्मीरसाठी असलेलं कलम ३७० रद्द करायला राज्यसभेची मंजुरी मिळाली आहे. १२५ विरुद्ध ६१ मतांनी हा अनुच्छेद रद्द करायला राज्यसभेने मंजुरी दिली. यामुळे जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द झालं आहे. 

मोदी सरकारने सोमवारी संसदेत काश्मीरमधील कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात राज्यसभेत निवेदन दिले. यानंतर राज्यसभेत विरोधकांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला.

हे दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आता जम्मू आणि काश्मीर राज्याला लाभलेला स्वायत्त राज्याचा दर्जा संपुष्टात येणार आहे. या बरोबरच जम्मू आणि काश्मीरमध्ये संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणूक करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. याशिवाय राज्याच्या कायद्यात केंद्र सरकारला हस्तक्षेपही करता येणार आहे.