Video : तोडून टाक! पाहा 'बॉक्सिंगचा बच्चन' आलाय तुमच्या भेटीला

दमदार व्यक्तीमत्त्वासोबतच दमदार कथानकाचीही जोड मिळाल्यामुळं हा व्हिडीओ खऱ्या अर्थानं गाजतोय

Updated: Jun 30, 2021, 02:50 PM IST
Video : तोडून टाक! पाहा 'बॉक्सिंगचा बच्चन' आलाय तुमच्या भेटीला title=

मुंबई : बॉक्सिंगचा बच्चन कोण, असा प्रश्न कोणी तुम्हाला विचारला आणि त्याचं उत्तर तुमच्या नेमकं लक्षात येत नसेल तर सर्वप्रथम एक व्हिडीओ तुम्ही पाहाच. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. दमदार व्यक्तीमत्त्वासोबतच दमदार कथानकाचीही जोड मिळाल्यामुळं हा व्हिडीओ खऱ्या अर्थानं गाजतोय. हा व्हिडीओ आहे 'तुफान' या चित्रपटाच्या ट्रेलरचा.

अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'तूफान' या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच सर्वांचं लक्ष वेधलं आहे. फरहान अख्तरकडे कायमच एक प्रयोगशील अभिनेता म्हणून पाहिलं गेलं आहे. याचीच प्रचिती त्याच्या या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं येत आहे. चित्रपटात त्याचं बदलतं रुप असंख्य नजरा खिळवून ठेवत आहे. यावर चार चाँद लावत आहे ती म्हणजे फरहानची पिळदार शरीरयष्टी.

मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या फरहान अख्तरसोबतच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेता परेश रावल हेसुद्घा तितक्यात महत्त्वाच्या भूमिका बजावताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं हिंदी चित्रपटामध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेचा प्रभावी वापरही पाहायला मिळणार आहे. त्यामुळं हीसुद्धा चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे.

अज्जू भाईपासून बॉक्सर अजीज अलीपर्यंतचा प्रवास, त्यामधूनच उलगडणारी प्रेमकहाणी आणि त्याला जोड असणारी किंबहुना मुख्य धागा असणारी एका जिद्दीची कहाणी म्हणजेच 'तूफान'. या चित्रपटातून परेश रावल हे एका प्रशिक्षकाच्या रुपात दिसणार आहेत. त्यामुळं चाहत्यांसाठी हीसुद्धा एक परवणी ठरणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनात साकारलेला हा चित्रपट 16 जुलै रोजी अॅमेझॉन प्राईमच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.