...म्हणून भाऊ कदम यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

आगरी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी भाऊ वादाच्या भोवऱ्यात   

Updated: Nov 12, 2018, 02:12 PM IST
...म्हणून भाऊ कदम यांच्याकडून दिलगिरी व्यक्त  title=

मुंबई : विनोदाची परिभाषा बदलून मराठी कलाविश्वात वेगळाच ठसा उमटवणारा एक कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. शब्दांची जुळवाजुळव आणि कलाकारांचा अफलातून अभिनय, या साऱ्याच्या बळावर फार कमी वेळातच या कार्यक्रमाला अनेकांचीच पसंती मिळाली. 

प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारा हाच कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

५ आणि ६ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या कार्यक्रमाच्या भागांदरम्यान, आगरी पात्राच्या सहाय्याने या कलाकारांनी विनोद निर्मिती केली. पण, आगरी समाजातील काहींना मात्र हा विनोद रुचला नाही. 

विनोदी शैली खटकल्याच्याच कारणामुळे आणि भावना दुखावल्याच्या कारणामुळे काही सामाजिक संघटनांनी ही बाब भाऊ कदम यांच्या निदर्शनास आणून दिली. 

आगरी कवी मिथून भोईर उर्फ अधोक्षज भोईर यांचं विनोदी पात्र या कार्यक्रमाच्या एका भागात दाखवण्यात आलं होतं. आगरी पात्राच्या माध्यमातून विनोदनिर्मिती करण्यास काहीच हरकत नाही. पण, त्या माध्यमातून समाजावर  टीका करण्याचा कोणालाच अधिकार नाही असं म्हणत या वादाला तोंड फुटलं. 

सदर प्रकरणी समजाचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी आगरी-कोळी भुमिपूत्र संघटनेतर्फे करण्यात आली होती. 

आपल्याकडून विनोद करतेवेळी चूक झाल्याचं म्हणत खुद्द भाऊ कदम यांनीही दिलगिरी व्यक्त करत तो आक्षेपार्ह भाग, व्हिडिओ डिलीट करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांच्यासोबत समाजाच्या शिष्ठमंडळातील काही सदस्य असल्याचंही पाहायला मिळालं. 

दरम्यान, वाहिनीतर्फेही सदर प्रकरणी आगरी समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी माफी मागितली. मुख्य म्हणजे कदम यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अनेकांनीच त्यांच्या वृत्तीला दाद दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या वादाला पूर्णविराम मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.