मुंबई : आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आलं तरीही काही स्वप्न मात्र आपला पाठलाग करणं कधीही थांबवत नाहीत. ही स्वप्न आपल्याशी जणू कायमस्वरुपी जोडलेली असतात. अशा या स्वप्नांच्याच विचारात असणाऱ्या एका सौंदर्यवतीनं कमालीची मजल मारत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC यूपीएससीच्या परीक्षेमध्ये मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेमध्ये अंतिम फेरीपर्यंत जाणाऱ्या Aishwarya Sheoron हिनं देशभरातील परीक्षार्थींमधून ९३ वं स्थान पटकावलं आहे.
२०१४ मध्ये ऐश्वर्यानं सौंदर्यविश्वामध्ये पदार्पण केलं. ज्यानंतर तिनं २०१६ मध्ये मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतही स्थान मिळवलं. इतकंच नव्हे, तर फॅशन आणि कलाजगतातही तिनं नशीब आजमावलं. फॅशन विश्वातील कारकिर्द आणि यूपीएससीसाठीचा अभ्यास हा तिचा प्रवास सोपा नव्हता. पण, सनदी अधिकारी होण्याची जिद्द तिनं सोडली नव्हती.
'परीक्षेच्या तयारीसाठी मला माझा फोनही बंद करावा लागला होता, सोशल मीडिया अकाऊंट बंद ठेवावे लागले होते आणि पाहा निकाल हाती आला आहे. बरं अभ्यासामध्ये मला एकाएकी रुची वाटू लागली असं नाही. तर, मी आधीपासूनच अभ्यासू वृत्तीची होते' असं ऐश्वर्या म्हणाली. देशसेवेसाठी लोकसोवा आयोगाची परीक्षा देण्याचा विचार सातत्यानं तिच्या मनात घर करत होता.
फेमिना मिस इंडियाकडूनही ऐश्वर्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आणि १९९४ मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावणारी ऐश्वर्या राय हिच्या नावावरुन ऐश्वर्याच्या आईनं तिचं नाव ठेवलं होतं.