Confirmed! आणखी एका नव्या इनिंगसाठी करीना सज्ज

करीना तिच्या अनोख्या अंदाजासाठी आणि तितक्याच नव्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. 

Updated: Apr 11, 2019, 08:33 PM IST
Confirmed! आणखी एका नव्या इनिंगसाठी करीना सज्ज

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी बेबो, बेगम म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच तिच्या अनोख्या अंदाजासाठी आणि तितक्याच नव्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. कलाविश्वातील हीच अभिनेत्री येत्या काळात एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाल्याचं आता निश्चित झालं आहे. रुपेरी पडदा गाजवणारी करीना आता टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहे. 

करीना कोणत्या मालिकेतून नव्हे तर, एका रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'झी टीव्ही' या वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोच्या परीक्षकांपैकी एक चेहरा हा करीनाचा असणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा हाती घेतलेल्या धीरज धूपर यानेच याविषयीची माहिती दिली. 'हिंदुस्तान टाईम्स'शी संवाद साधताना त्याने याविषयीची उत्सुकता व्यक्त केली. 

'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत असताना 'करीनासमोर उभं राहणं ही एक वेगळीच बाब आहे. कधी एकदा तिच्यासमोर उभं राहून तिच्याचविषयी काहीतरीह बोलतो याचीच मी वाट पाहत आहे', असं धीरज मोठ्या कुतूहलाने आणि तितक्याच उत्सुकतेने म्हणाला. धीरज या कार्यक्रमासाठी जितका उत्सुक आहे तितकीच उत्सुकता चाहत्यांमध्येही आहे. कारण, परीक्षकाच्या रुपात करीना प्रथमच अशी सर्वांसमोर येणार आहे. 

बी- टाऊनची बेगम म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटातून झळकली होती. येत्या काळात ती 'गुड न्यूज'च्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अक्षय कुमार, दिलजीत दोसांज हे कलाकारही या चित्रपटाचा एक भाग असणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने करीना आणि खिलाडी कुमार तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी ही खरोखरच 'गुड न्यूज'च आहे असं म्हणायला हरकत नाही.