मुंबई : मुंबई क्राईम ब्रँचकडून फेक सोशल मीडिया फॉलोअर्स घोटाळ्याची चौकशी जसजशी पुढे जात आहे. तसे त्यात अनेक धक्कादायक खुलासे देखील होत आहेत. या तपासात सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे, फेक फॉलोअर्स असणाऱ्या लोकांच्या यादीत दीपिका आणि प्रियांका चोप्रा यांचं देखील नाव आहे. या बनावट फॉलोअर्सला इन्स्टाग्रामच्या भाषेत "बॉट्स" म्हणतात. आता मुंबई पोलीस लवकरच या सर्व सेलिब्रिटींची चौकशी करू शकतात. येत्या आठवड्यापासून ही चौकशी सुरू होईल, ज्यात गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 100 ते 150 जणांचे स्टेटमेंट घेतले जातील.
स्टेटमेंट घेताना पोलीस अधिकारी या सेलिब्रिटींना त्यांच्या फॉलोअर्स बाबतची माहिती आणि पुरावा मागतील. म्हणजेच या सेलिब्रिटींना आता हे सिद्ध करावं लागेल की, हे त्यांचे खरे फॉलोअर्स आहेत. कोणत्याही कंपनीकडून त्यांनी ते विकत घेतलेले नाहीत. आतापर्यंत या प्रकरणात 18 लोकांची चौकशी झाली आहे. ज्यापैकी अनेक जण हे बॉलिवुड किंवा टेलीविजन इंडस्ट्रीमधील आहेत. यामध्ये निर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्री या शिवाय मेकअप आर्टिस्ट, कोरियोग्राफर, असिस्टेंट डायरेक्टर यांचा देखील समावेश आहे. यासोबतच मुंबई क्राईम ब्रांचने फ्रांन्स सरकारला एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये followerscart.com या वेबसाईटशी संबंधित लोकांची माहिती मागवण्यात आली आहे.
आतापर्यंत क्राईम ब्रांचने जवळपास 68 अशा कंपन्यांची माहिती गोळा केली आहे. ज्या फेक सोशल मीडिया फॉलोअर्सचं रॅकेट चालवतात. पोलिसांनी या प्रकरणात आधीच अभिषेक नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.
क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार, हे संपूर्ण सिस्टम Cost per Post वर चालते. म्हणजे सोशल मीडियाच्या यूजरचा रेट फिक्स केला जातो. ज्याचे जास्त फॉलोअर्स, त्याला कोणत्याही ब्रँडशी संबंधित सोशल मीडिया पोस्ट टाकण्यासाठी पैसे मिळतात. त्यामुळे अनेक बॉलीवुड आणि टीव्ही सेलिब्रिटी अशा कंपन्यांकडून फेक फॉलोअर्स विकत घेतात. पण आता ही गोष्ट क्राईम ब्रांचच्या समोर आली आहे.