घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने 6 जणांना चिरडलं

घाटकोपर पश्चिमेच्या चिराग नगर येथे एका भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडलं आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

शिवराज यादव | Updated: Dec 27, 2024, 08:37 PM IST
घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने 6 जणांना चिरडलं title=

घाटकोपर पश्चिमेच्या चिराग नगर येथे एका भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडलं आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 2 ते 3 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. कुर्ल्यात भरधाव बसने लोकांना चिरडल्याची घटना ताजी असताना त्याची पुनरावृत्ती घाटकोपरमध्ये झाली आहे. दरम्यान अपघातानंतर लोकांनी टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. 

संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास नारायण नगर येथून टेम्पो निघाला होता. थंड पेय घेऊन जाणारा हा टेम्पो भरधाव वेगाने जात होता, त्यावेळी टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं आणि 5 ते 6 जणांना धडक दिली. जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर लोकांनी चालकाला पकडून घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. 

कुर्ल्यात बसने लोकांना चिरडलं

कुर्ला पश्चिमेतील एस.जी. बर्वे मार्गावरील अंजुमन ए इस्लाम शाळेसमोर 9 डिसेंबर रोजी रात्री इलेक्ट्रिक बेस्ट बस पादचारी आणि वाहनांना चिरडून एका कमानीवर आदळली. कुर्ला- अंधेरी दरम्यान धावणाऱ्या बस मार्ग क्रमांक 332 मुळे झालेल्या या अपघातामुळे वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडले होते. वाहनाने अचानक वेग घेतला आणि वाटेत येणाऱ्यांना सुमारे 200 मीटरपर्यंत फरफटत नेले. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आणि 42 जण जखमी झाले. याशिवाय, 20 वाहनांचं नुकसानाही झाले. या दुर्घटनेप्रकरणी मोरे याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.