मुंबई : त्या काळात प्रत्येक तरूणीच्या मनातील हिरो म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेता देव आनंद यांचा आज वाढदिवस. जरी करोडो मुली देव आनंद यांच्यावर जीव ओवाळत असतं पण त्यांच्या प्रेमाला मात्र कधीच न्याय मिळाला नाही. त्यांच्या जन्मदिनी पाहूया त्यांची अधुरी प्रेमकहाणी...
देव आनंद यांचा जन्म पंजाबच्या शंकरगड म्हणजे आताच्या पाकिस्तानात झाला. 26 सप्टेंबर 1923 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी लाहोरमधून इंग्रजीत अभ्यास केला. मात्र त्यांच मन सिनेमाकडे ओढ घेत होतं. सिनेमाच्या या प्रेमापोटी ते मुंबईत आले. देव आनंद यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1946 मध्ये 'हम एक हैं' या सिनेमातून केली. हिरो म्हणून पडद्यावर आलेला हा सिनेमा मात्र चालला नाही. 1948 मध्ये 'जिद्दी' आला आणि या सिनेमाने देव आनंद साहेबांना हिट केलं. या दरम्यान देव आनंद यांना एका अभिनेत्रीशी प्रेम झालं. ती देखील देवआनंद साहेबांवर फिदा होती.
देव आनंद यांच्या जीवनात सुरैया प्रेम घेऊन आल्या. सुरैया तेव्हा मोठ्या स्टार होत्या आणि देव आनंद तेव्हा प्रगती करत होती. देव आनंद यांनी 'रोमांसिंग विद लाइफ' या आत्मकथेत या प्रेमाचा उल्लेख केला आहे. कामादरम्यान आमची मैत्री झाली आणि मग त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आम्ही तासन् तास गप्पा मारत असत. सुरैया यांच्या आजीचा या सगळ्याला विरोध होता. आजीला विचारूनच सगळ्या गोष्टी केल्या जात असतं. मी हिंदू होतो आणि सुरैया मुस्लिम त्यामुळे या लग्नाला विरोध झाला.
घरातून जेवढा विरोध होत होता तेवढे हे दोघे एकमेकांच्या जवळ येत असतं. त्यांच्या भेटण्यावर बंधन आणलं गेलं. तेव्हा देव आनंद यांनी सुरैयाकरता साखरपुड्याची अंगठी घेतली. मी ती अंगठी देण्यासाठी गेलो तेव्हा सुरैया यांनी ती समुद्रात फेकली. मी त्यांना कधीच विचारलं नाही त्यांनी असं का केलं. मी तिथून निघून गेलो. असं देवआनंद यांनी सांगितलं. त्यानंतर देव आनंद आणि सुरैया यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. सुरैया यांनी लग्न देखील केलं नाही. त्या देव आनंद यांच्या प्रेमाला कधीच विसरल्या नाहीत.