मुंबई : देव आनंद त्या काळातील एक सर्वेात्कृष्ट कलाकार होते. याशिवाय ते त्यांच्या काळातील फॅशन आयकॉनही होते. एवढंच नव्हे तर देव आनंद यांचा चाहतावर्ग खूप मोठा होता. देव आनंद यांच्या काळ्या कोटची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. पण या काळ्या कोटशिवाय आणखी एक किस्सा आहे ज्यांमुळे देव आनंद चर्चेचा विषय ठरले होते. तो किस्सा म्हणजे कल्पना कार्तिकशी यांच्यासोबत केलेलं लग्न.
प्रेम न मिळाल्याने देव तुटले होते
देव आनंद यांचं पहिलं प्रेम अभिनेत्री सुरैया होतं. मात्र या दोघांमध्ये धर्माची भिंत आड आली. देव सुरैया यांच्यावर जिवापाड प्रेम करायचे. मात्र सुरैया यांच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं. सुरैया यांच्याशी संबंध तुटल्यानंतर देव वाईट रीतीने तुटले होते. मात्र यानंतर कल्पना कार्तिक त्यांच्या आयुष्यात आल्या.
कल्पना कार्तिक यांना बनवलं जीवनसाथी
1954 मध्ये देव आनंद यांनी आपल्या सिनेमातील अभिनेत्री मोना सिंग म्हणजेच कल्पना कार्तिक यांच्याशी लग्न केलं. कल्पना यांचा धर्म ख्रिश्चन होता. त्यांनी केवळ 5 चित्रपटांत काम केलं होतं. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या या पाचही चित्रपटांचे हिरो देव होते. कल्पना यांनी शिमला येथे शिक्षण घेतलं असून त्यांनी मिस शिमला ब्युटी कॉन्टेस्टचा किताब जिंकला.
कल्पना कार्तिक कोण आहेत
देव साहेबांचे मोठे भाऊ चेतन आनंद यांची नजर कल्पना यांच्यावर पडली आणि त्यांनी कल्पना यांच्या कुटूंबाशी बोलून कल्पनाला मुंबईला पाठविण्यास सांगितलं. 1951 मध्ये चेतन आनंद 'बाजी' हा चित्रपट बनवत होते. त्यांनी या सिनेमासाठी कल्पना यांना मुख्य अभिनेत्री म्हणून साइन केलं. या चित्रपटात कल्पना यांनी डॉक्टरची भूमिका साकारली होती. खरं तर चेतन यांनी त्यांचं नाव बदलून कल्पना कार्तिक ठेवलं होतं.
'बाझी' चित्रपटानंतर कल्पना यांनी आणखी चार चित्रपट केले. आंधियां (1952), हाउस नंबर 44 (1954), टैक्सी ड्राइवर (1954) और नौ दे ग्यारह (1957) या सिनेमांत त्यांनी काम केलं. या चित्रपटांमध्ये देव आनंद देखील मुख्य भूमिकेत होते.
लंच ब्रेक मध्ये लग्न
या चित्रपटाच्या प्रवासा दरम्यान देव आनंद आणि कल्पना यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. टॅक्सी ड्रायव्हर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देव आनंद आणि कल्पना लंच ब्रेकमधून बाहेर पडले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. यासाठी देव आनंद यांनी आधीच रजिस्ट्रारला सेटवर बोलवलं होतं.
यानंतर कल्पना यांनी या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्विकारली. यामध्ये त्या पूर्णपणे गुंतून गेल्या. कल्पनाचं फिल्मी करिअर लहान होतं. पण छोट्या कारकीर्दीतून देखील त्यांनी आपल्या आयुष्याला एक यशस्वी प्रवास दिला.