धनश्रीची 'युवा डान्सिंग क्वीन'च्या सेटवर नवी मैत्रीण

अद्वैत दादरकरच्या खुमासदार सूत्रसंचालनाला आता गंगाची सोबत

Updated: Jan 18, 2020, 02:11 PM IST
धनश्रीची 'युवा डान्सिंग क्वीन'च्या सेटवर नवी मैत्रीण  title=

मुंबई : 'झी युवा'वर सुरू असलेली 'युवा डान्सिंग क्वीन' ही स्पर्धा, अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झालेली आहे. १३ ललनांचा सहभाग असलेली ही स्पर्धा आता अधिक चुरशीची होऊ लागलेली आहे. परीक्षक मयूर वैद्य आणि सोनाली कुलकर्णी यांचा कस लागत आहे. स्पर्धकांच्या उत्तमोत्तम परफॉर्मन्समुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढली आहे. अद्वैत दादरकर याचे खुमासदार सूत्रसंचालन आणि स्पर्धकांमधील वाढलेली चुरस, यामुळे हा कार्यक्रम यशाची नवनवी शिखरे गाठत आहे. 'झी युवा' वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच नवनवीन गोष्टी घेऊन येत असते. 'युवा डान्सिंग क्वीन'मधून होणारे प्रेक्षकांचे मनोरंजन सुद्धा याला अपवाद ठरलेले नाही.

अद्वैत दादरकरच्या खुमासदार सूत्रसंचालनाला आता गंगाची सोबत लाभलेली आहे. त्यांच्यातील जुगलबंदीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली आहे. याशिवाय, अधिकाधिक उत्तम होत जाणारे स्पर्धकांचे परफॉर्मन्स सुद्धा मनोरंजन करत आहेत. स्पर्धेतील चुरस सुद्धा वाढली आहे. या सगळ्या माहोलात, धनश्री आणि पूर्वा यांच्यासाठी एक खास गोष्ट घडली आहे.

या दोघींना 'युवा डान्सिंग क्वीन'च्या निमित्ताने एक नवी मैत्रीण मिळालेली आहे. ही मैत्री होण्याचं कारण सुद्धा तसंच खास आहे. या स्पर्धकांची थट्टा करण्याची संधी अद्वैत सोडत नाही. अशावेळी, त्यांची बाजू घेणारी गंगा, आता स्पर्धकांना आपलीशी वाटू लागली आहे. त्यांच्यातील मैत्री अधिक दृढ होत आहे.

या मैत्रीविषयी बोलताना धनश्री म्हणते, "थोड्याच दिवसात, गंगासोबत खूप छान गट्टी जमली आहे. मी अत्यंत बडबडी आहे. आम्हाला दोघींना गप्पा मारायला खूप आवडत असल्याने, आमच्या भरपूर गप्पा सुरू असतात. माझा पुढचा परफॉर्मन्स खास तिच्यासाठी असणार आहे. गंगाच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी बाजू यातून पाहायला मिळेल. मला खात्री आहे, की सगळ्यांनाच माझा हा परफॉर्मन्स आवडेल." आपल्या या खास मैत्रिणीबद्दल बोलायला पूर्वादेखील विसरली नाही. ती म्हणाली,
"गंगा खूपच गोड आणि सगळ्यांची काळजी घेणारी आहे. आम्हाला सतत प्रोत्साहन देण्यात ती पुढे असते. आणखी महत्वाचं म्हणजे, माझी अनेक गुपितं तिच्याकडे सेफ आहेत, याची मला खात्री आहे.