कलाकारांच्या गर्दीत धडपडलेला ‘साहो’

'साहो' रिव्ह्यू...

Updated: Aug 30, 2019, 04:33 PM IST
कलाकारांच्या गर्दीत धडपडलेला ‘साहो’ title=

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 

दिग्दर्शक : सुजित 
निर्माते : वमसी कृष्ण रेड्डी, प्रमोद उप्पालपती, भूषण कुमार 
मुख्य भूमिका : प्रभास, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे आणि इतर...  

‘जो दिखता है... वो अक्सर होता नही और......’,  हे म्हणतात ना ते खरंच आहे. काही चित्रपट हे त्यांच्या नावामुळे लोकप्रिय होतात, तर काही हे त्यात असणाऱ्या कलाकारांमुळे. सुजित दिग्दर्शित ‘साहो’ या चित्रपटाच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे या चिेत्रपटाच्या नावाची घोषणा झाली तेव्हापासूनच ‘साहो’ प्रकरण असेल तरी काय?, असं राहून राहून मनात येत होतं. तर, प्रभास आहे म्हटल्यावर काहीतरी भन्नाटच असणार अशा अपेक्षाही होत्या. अशाच प्रश्न आणि अपेक्षांच्या वातावरणात अखेर ‘साहो’ प्रदर्शित झाला.

पैसा, पैसा आणि पैसा.... हा या चित्रपटाचा मुख्य कलाकार असंच म्हणावं लागेल. नाहीतर, या चित्रपटातील प्रत्येक कलाकार मुख्यच वाटू लागतोय. ‘ये दुनिया पैसे पे चलती है’ असं म्हणतात ते उगाच नाही, हे चित्रपटाच्या सुरुवातीच्याच दृश्यातून लक्षात येतं. प्रभास साकारत असणाऱ्या ‘अशोक चक्रवर्ती’ची अपेक्षित अशी धमाकेदार एंट्री, त्यानंतर श्रद्धा कपूर हिच्यासोबतची त्याची केमिस्ट्री हे सारंकाही चित्रपटात साकारण्यात आलं आहे. याला साथ आहे ती म्हणजे एका अशा कारवाईची, खरंतर चोराच्या तपासाची ज्याचा शोध घेता घेता मुंबई आणि वाझी अशा ठिकाणांवर कोण, कधी आणि कसं पोहोचतं हे पचवण्यासाठी पुन्हा काही सेकंद मागे जावं लागतं.

एक चोरी, त्यात सहभागी चोराच्या शोधात असणारी स्थानिक पोलीस यंत्रणा आणि असंख्य फितूर... हे मुद्दे घेत कथानक पुढे जात असतानाच आता नवं काय... असा सूर प्रेक्षकांमध्ये आळवला जातो, अर्थात त्यात नकारात्मकेची झलक जास्त दिसते.  

मल्टीस्टारर चित्रपट म्हणून ‘साहो’ची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. पण, हेच मल्टी स्टार्स अर्थात प्रभास (साहो, अशोक), श्रद्धा कपूर (अमृता नायर), जॅकी श्रॉफ (रॉय), नील नितीन मुकेश, मुरली शर्मा (डेव्हिड), मंदिरा बेदी (कल्की), चंकी पांडे (देवराज), महेश मांजरेकर (प्रिंस) आणि इतर कलाकारांसह जॅकलिन फर्नांडिसची एका गाण्यात पाहुण्या कलाकाराची भूमिका हे सारं सारंकाही एका चित्रपटात म्हणजेच ‘साहो’च्या अध्यायात सामावलं आहे. त्यात भरमसाट अॅक्शनचा भरणा आहेच. चित्रपटाची गरज पाहता तेही स्वीकारार्ह. पण, मल्टीस्टारर चित्रपट आणि उगाचच प्रेक्षकांना गोंधळात टाकण्याचा अट्टहास का?, हा महत्त्वाचा मुद्दा.

पार्श्वसंगीत ही चित्रपटात जिवंतपणा आणणारी जमेची बाजू. पण, चित्रपटातील गीतं मात्र अपेक्षित जादू करु शकलेली नाहीत. चित्रपटामध्ये कलाकारांच्या वेशभूषेवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. पण, संवादांच्या बाबतीत ‘साहो’ भरकटताना दिसतो. विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साहो’तील अॅक्शन सीन्स म्हणजेच साहस दृश्य प्रशंसनीय आहेत. पण, काही अंशी त्या बाबतीत अतिशयोक्ती केल्याचंही जाणवतं सरतेशेवटी त्यावरच चित्रपटाची मदार आहे असं नाही ना. ‘साहो’ पाहताना अखेरच्या टप्प्यात काही पात्रांचा शेवटही नेमका असा का? हा प्रश्न भंडावून सोडतो.

‘साहो’मध्ये प्रभासचा अंदाज या साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत आहे. प्रचंड निर्मिती खर्च करत उभारण्यात आलेलं हे साम्राज्य, प्रेक्षकांची मनं जिंकेलही. पण, मुळात जवळपास तीन तासांच्या काट्यांपर्यंत येणाऱ्या या ‘साहो’पटात हे असं का...? हा प्रश्न मांडायला अनेकदा वाव आहे हे खरं.

- सायली पाटील
SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com