close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अखेर विवाहबंधनात

मानधनाचा आकडा ऐकूनच व्हाल थक्क..... 

Updated: Aug 22, 2019, 10:21 AM IST
सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अखेर विवाहबंधनात
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनय आणि तितक्याच प्रभावशाली व्यक्तीमत्वाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर एका चेहऱ्याने कायम अधिराज्य गाजवलं. सोशल मीडियावरही हा चेहरा चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. तो चेहरा म्हणजे WWE मध्ये भल्याभल्यांचा थरकाप उडवणाऱ्या 'द रॉक' म्हणजेच ड्वेन जॉन्सनचा. 

ड्वेन सध्या भलताच आनंदात असावा. त्याच्या आनंदाची कारणंही तशीच आहेत. त्यातील पहिलं आणि तितकंच खास कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच ड्वेन अखेर त्याच्या दीर्घकाळापासून सोबत असणाऱ्या Lauren Hashian या प्रेयसीशी विवाहबंधनात अडकला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने हवाईमध्ये झालेल्या या अत्यंत खासगी विवाहसोहळ्याविषयी माहिती देत सुंदर फोटो शेअर केले. 

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये ड्वेन आणि लॉरेन शुभ्र पेहरावात दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वकाही सांगत आहे. 'We do...', असं लिहित त्याने लग्नाची तारीखही सर्वांसमोर आणली आहे. २००६ मध्ये लॉरेन पहिल्यांदाच ड्वेनला भेटली होती. ज्यानंतर २००८ पासून या दोघांच्या नात्याची सुरुवात झाली. जवळपास तेरा वर्षांहून अधिक काळ एकत्र व्यतीत केल्यानंतर अखेर ड्वेन आणि लॉरेन यांनी त्यांच्या नात्याला नवं नाव दिलं. 

जागतिक स्तरावर नावारुपास आलेल्या ड्वेनच्या आनंदाचं दुसरं कारण म्हणजे, सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्याच्या नावाचा अग्रस्थानी समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सकडूनच याविषयीची माहिती देण्यात आली. तो 'एचबीओ'च्या 'बॉलर्स' या एका शोसाठी प्रत्येक भागाचं $700,000 इतकं मानधन आकारतो. हा आकडा पाहता कित्येकांचा त्यावर विश्वासही बसत नाही आहे. 

सर्वाधिक मानधनाच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या ड्वेनमागोमाग अनुक्रमे अभिनेता क्रिस हेम्सवर्थ, रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर यांच्याही नावांचा समावेश आहे. या यादीत ब्रॅडली कूपर, क्रिस इवन्स, पॉल रड, जॅकी चॅन, ऍडम सँडलर आणि विल स्मिथ यांचीही नावं आहेत.