Gulbo Sitabo Trailer: अमिताभ बच्चन-आयुष्मान खुराना जोडीची धम्माल केमिस्ट्री

चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच...

Updated: May 22, 2020, 06:56 PM IST
Gulbo Sitabo Trailer: अमिताभ बच्चन-आयुष्मान खुराना जोडीची धम्माल केमिस्ट्री

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांचा 'गुलाबो सिताबो' (Gulbo Sitabo) हा चित्रपट डिजिटली प्रदर्शित होणार आहे. त्याआधी काही वेळापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्यातील घरमालक आणि भाडेकरु अशी केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच मजेशीर अनुभव देईल.

चित्रपटात अमिताभ बच्चन एका जुन्या, मोठ्या हवेलीचे मालक आहेत. त्याचं रोज आपल्या भाडेकरुसोबत काही ना काही कारणाने वाद होतात. लखनऊमधील जुन्या, मोठ्या, पडिक होत असलेल्या घरावर, हवेलीवर अमिताभ यांचं प्रेम आहे. पण ते ती हवेली विकण्याचा निर्णय घेतात आणि कशाप्रकारे कोर्ट-कचेरीच्या फंदात पडतात, हे अतिशय मजेशीरपणे दाखवण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये संपूर्ण देसी, बोली भाषेचा वापर करण्यात आला आहे. ट्रेलरमधून अमिताभ यांचा लूक अतिशय वेगळा आणि तितकाच खरा वाटत असून आयुष्यमानचाही हटके अंदाज प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरेल.

शुजीत सरकार यांनी 'गुलाबो-सिताबो'चं दिग्दर्शन केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती रॉनी लहरी आणि शील कुमार यांनी केली आहे. 'गुलाबो-सिताबो' 17 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज तारिख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता 12 जून रोजी अमेझॉन प्राईमवर 'गुलाबो-सिताबो' डिजिटली रिलीज करण्यात येणार आहे.