Sonakshi Sinha Talk About Equal Pay : बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणून सोनाक्षी सिन्हाला ओळखले जाते. सध्या सोनाक्षी ही 'हिरामंडी' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिच्या या वेबसीरिजमधील भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता सोनाक्षीने अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनातील तफावतीबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने मी अजूनही पैशांसाठी भांडत असल्याचे सांगितले.
सोनाक्षी सिन्हाने 'हिरामंडी' या वेबसीरिजच्या निमित्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाला तिचे करिअर आणि मानधन याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली, "सध्या मी माझ्या करिअरच्या सर्वोत्तम टप्प्यात आहे. मला ज्या प्रकारच्या भूमिका करायच्या होत्या, त्याच प्रकारच्या भूमिका मी आतापर्यंत करत आली आहे. मी साकारलेली प्रत्येक भूमिका ही इतरांपेक्षा वेगळी असल्याने मला त्याचा आनंद आहे. मी माझ्या करिअरच्या सर्वात चांगल्या टप्प्यात असूनही पैशांसाठी मात्र झगडत आहे."
"माझ्यासाठी हे सर्व अजिबात सोपे नाही आणि कधीकधी मला ते योग्यही वाटत नाही. जेव्हा चित्रपट निर्माते तुमच्याशी संपर्क साधतात, तेव्हा त्यांना तुमच्या अपेक्षांची पूर्ण कल्पना असते. पण जेव्हा पैशांचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येक अभिनेत्रीने तिची फी कमी करावी, असे प्रत्येकाला वाटते. पण प्रत्येक वेळी अभिनेत्रीसोबतच हे का होते? हे मला समजत नाही. मला एक महिला म्हणून कायम ही लढाई लढावी लागते. सध्या महिला अनेक प्रकारच्या लढाई लढत आहेत आणि मानधनातील तफावत ही यातीलच एक लढाई आहे", असे सोनाक्षी सिन्हा म्हणाली.
सोनाक्षी सिन्हाने 'हिरामंडी' या चित्रपटाच्या सेटवरील वागणुकीबद्दल विचारण्यात आले. त्यावर सोनाक्षी म्हणाली, "मला संजय सरांकडून खूप चांगली वागणूक मिळाली. त्यांनी माझे कौतुकही केले. मी खूप सक्षम कलाकार आहे", असे संजय सरांनी म्हटले होते. मी त्यांचे हे वाक्य ऐकून बेशुद्ध होणार होती. यावेळी सोनाक्षीला 'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये तुला इतर कोणता रोल करण्याची इच्छा होती, असे विचारण्यात आले. त्यावर तिने "मला बिब्बो जान हे पात्र साकारयला आवडले असते." सध्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये अदिती राव हैदरीने बिब्बो जान हे पात्र साकारले आहे.
दरम्यान 'हिरामंडी' ही वेबसीरिज गेल्या 1 मे रोजी प्रदर्शित झाली. ही वेबसीरिज 190 देशात प्रदर्शित झाली असून याचे 8 भाग आहेत. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहगल या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकत आहेत. तसेच यात अभिनेता फरदीन खान, शेखर सुमन, ताहा शाह आणि अध्ययन सुमन हे कलाकारही दिसत आहेत.