'शोले'मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीचं निधन

'परिचय' या चित्रपटातूनही त्या झळकल्या होत्या. 

Updated: Dec 15, 2019, 01:00 PM IST
'शोले'मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीचं निधन
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचं शनिवारी म्हणजेच १४ डिसेंबरला सायंकाळी   मुंबईत निधन झालं. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या एम.एस.सथ्यु यांच्या 'गरम हवा'मधील उत्तम अभिनयासाठी त्या ओळखल्या जात होत्या. राष्ट्रीय एकात्मतेच्या मुद्द्यावर आधारलेल्या या चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला होता. ज्यामध्ये गीता यांनी 'अमीना' ही भूमिका साकारली होती. 

१९७२ मध्ये आलेल्या गुलजार यांच्या 'परिचय' या चित्रपटातूनही त्या झळकल्या होत्या. या चित्रपटापासूनच त्यांनी कलाविश्वात पाऊल ठेवलं होतं. 'शोले', 'त्रिशूल', 'राम तेरी गंगा मैली', 'शौकीन', 'अर्थ', 'एक चादर मैली सी', 'गमन' आणि 'दूसरा आदमी' यांसारख्या चित्रपटांतूनही त्यांनी काम केलं आहे. 

Parichay actress Gita Siddharth Kak dies

निर्माता सिद्धार्थ काक यांच्यासोहत गीता विवाहबंधनात अडकल्या होत्या. ते 'सुरभी' या कार्यक्रमासाठीही ओळखले जातात. दूरदर्शनवर १९९० ते २००१ या काळात हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. गीता आणि सिद्धार्थ यांना एक कन्या आहे. ती माहितीपट क्षेत्रात कार्यरत आहे. गीता काक या कलाविश्वातील त्यांच्या कारकिर्दीसोबतच समाजकार्यासाठीही ओळखल्या जातात.