Paragliding करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

म्हणे.... कोहरा ही कोहरा 

Updated: Nov 16, 2019, 02:13 PM IST
Paragliding करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल
फेसबुक व्हिडिओ

मुंबई : काही दिवसांपूर्वी हिमाचलमध्ये  #paragliding करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. '...और मै खुले आसमान मे उड रहा हूँ' असं म्हणणारा तो तरुण सर्वांनाच आठवत असेल. अर्थात त्याचा व्हिडिओ आणि त्यानंतर प्रचंड व्हायरल होणारे मीम्स यांची चर्चा थांबत नाही, तोच आणखी एक पॅराग्लायडींगचा व्हिडिओ आता लक्ष वेधत आहे. 

'कोहरा ही कोहरा...' असं म्हणत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे एका मराठमोळ्या अभिनेत्रीने. मुंबई- पुणे महामार्गावरुन अनेकदा प्रवास करण्याऱ्या या अभिनेत्रीने आता या परिसरात जरा उडून पहावं म्हणून हे थरारक पाऊल या अभिनेत्रीने उचललं. संपूर्ण कुटुंबासह पॅराग्लायडिंगचा आनंद घेणारी ही अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 

हिरकणी या चित्रपटातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री आणि तिचा हा धमाल अंदाज पाहता तुम्हालाही असं एखाद्या पक्ष्याप्रमाणे आकाशात स्वच्छंदपणे विहार करायचा मोह आवरणार नाही. कामाच्या व्यापातून तुम्हाला हे कुठवर शक्य होईल हे ठाऊक नाही, पण तूर्तास सोनाली हा व्हिडिओ पाहून  #paraglidingचा आनंद मात्र तुम्ही घेऊच शकता. 

सोनालीने बालदिनाचा हॅशटॅगही या व्हिड़िओच्या कॅप्शनमध्ये वापरला आहे. त्यामुळे तिने यंदाचा बालदिन एका खास अंदाजात आणि खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवर जाऊन साजरा केला असंच म्हणावं लागेल. कामाच्या व्यापातून वेळ काढत सोनालीने तिच्या जीवनातील एक दिवस स्वत:साठी जगल्याचं पाहता अनेकांना तिचा हेवाही वाटत आहे.