मुंबई : पंजाबी गायक आणि अभिनेता हनी सिंग यांच्याविरुद्ध पत्नीच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये कोर्टात हजर न झाल्याबद्दल दिल्लीच्या न्यायालयाने हनी सिंगला जोरदार फटकारलं आहे.
मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट तानिया सिंह म्हणाल्या, "कोणीही कायद्याच्यावर नाही. हे प्रकरण किती हलकं घेतलं जात आहे हे पाहून मला आश्चर्य वाटतं आहे." सिंग यांनी वैद्यकीय आधारावर या प्रकरणात हजर राहण्यासाठी सूट मागण्यासाठी अर्ज दाखल केला होता, तर त्यांची पत्नी शालिनी तलवार न्यायालयात हजर झाल्या होत्या.
नाराजी व्यक्त करत कोर्टाने हनी सिंगच्या वकिलाला सांगितलं, "हनी सिंग हजर झाले नाहीत. तुम्ही त्यांचे उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र दाखल केलं नाही आणि युक्तिवाद करण्यासही तयार नाही." महानगर दंडाधिकाऱ्यांनी सिंग यांना न्यायालयात हजर राहण्याची शेवटची संधी दिली आणि पुन्हा असं वागू नका असं सांगितलं.
शालिनी तलवार यांनी पती हनी सिंग यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला असून नुकसानभरपाई म्हणून 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे. सिंह यांचे वकील ईशान मुखर्जी यांनी शालिनी तलवार यांच्या याचिकेला उत्तर देताना कोर्टाला सांगितलं की, शालिनीने दागिन्यांसोबत सगळ्या मौल्यवान वस्तू आधीच आपल्यासोबत घेतल्या आहेत आणि 15 दिवसांत नोएडाच्या घरात तिच्या सासरच्या माणसांसोबत दुकानात राहण्यासाठी येऊ शकतात.
"आम्ही त्यांना एकत्र ठेवण्यास तयार आहोत. आम्ही एक भिंत बांधू. ती 15 दिवसात त्यांना दिली जाऊ शकते," असं मुखर्जी म्हणाले. सिंग यांच्याकडे सुमारे 4 कोटी रुपयांच्या दोन मालमत्ता आहेत, त्यापैकी 1 कोटी रुपयांची एक मालमत्ता शालिनी तलवार यांच्या नावावर आहे.
23 जानेवारी 2011 रोजी हनी सिंह आणि शालिनी तलवार विवाहबंधनात अडकले. शालिनी यांनी आपल्या याचिकेत आरोप केला आहे की, हनीने गेल्या 10 वर्षांत तिचा शारीरिक छळ केला होता. तसेच सिंह यांनी आपली फसवणूक केल्याचंही सांगितलं.