Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी राज्यात थंडीनं काहीशी उशिरानंच पकड मजबूत केली. असं असलं तरीही ऑक्टोबरनंतर मात्र या थंडीनं दडी मारली आणि पुन्हा राज्यात तापमानवाढीचं चित्र पाहायला मिळालं. इथं ही स्थिती असतानाच मागील दोन ते तीन आठवड्यांपासून सातत्यानं महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात घट होत असल्यामुळं हवामान विभागानं सरत्या वर्षाच्या शेवटासोबतच नव्या वर्षाचं स्वागतही कडाक्याच्या थंडीनं होईल असा अंदाज वर्तवला आहे.
देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, अतीव उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या पर्वतरांगेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा थेट प्रभाव भारतातील हवामानावर दिसत आहे. ज्यामुळं पर्वतीय भागासह मैदानी क्षेत्रामध्येही तापमानात घट नोंदवली जात असून, दक्षिण भारत वगळता उर्वरित देशामध्येही याचा परिणाम पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात धुळे, नाशिक, परभणी, जेऊर इथं निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात येत असून, या भागांमध्ये तापमानाचा आकडा 4 ते 5 अंशांदरम्यान असल्याची माहिती मिळत आहे. तर, जळगाव, नागपूर, गोंदियासह राज्यातील कोकण किनारपट्टी क्षेत्रामध्येही गारठा जाणवू लागला आहे. गुरुवारी निफाडचा पारा 6 अंशांवर असून, इथं कमाल तापमान 28 इंश असल्याची नोंद करण्यात आली. या थंडीमुळं निफाडमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या.
सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुण्यातील घाटमाध्यावरील परिसरामध्ये धुक्याची चादर आणि बोचरी थंडी असं चित्र असल्यामुळं या भागांमध्ये हिवाळी सहली आणि सुट्ट्यांसाठी येणाऱ्यांचा ओघ वाढताना दिसत आहे. थोडक्यात 2024 या वर्षाचा शेवट थंडीच्या लाटेनं झाल्यास नव्या वर्षाच्या स्वागतालाही थंडीचा जोर कायम राहील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात चालू आठवडा संपून नव्या आठवड्याच्या सुरुवातीला काहीशी तापमानवाढ अपेक्षित असून, काही भागांमध्ये किमान तापमानातही वाढ होईल. पण, हे तीनि ते चार दिवस वगळता त्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
शहर | किमान | कमाल |
मुंबई | 19 | 33 |
पुणे | 9 | 30 |
नाशिक | 11 | 30 |
नागपूर | 12 | 28 |
औरंगाबाद | 15 | 30 |
कोल्हापूर | 16 | 30 |
महाबळेश्वर | 14 | 28 |
परभणी | 13 | 30 |