इम्रान खान- अवंतिकाच्या नात्यातील दुराव्याचं कारण स्पष्ट

२०११ साली इम्रान-अवंतिका विवाह बंधनात अडकले होते

Updated: Sep 27, 2019, 12:53 PM IST
इम्रान खान- अवंतिकाच्या नात्यातील दुराव्याचं कारण स्पष्ट

मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं सूत काणासोबत जुळेल आणि कोणाच्या नात्यात कधी दुरावा येईल हे सांगता येत नाही. एकेकाळी प्रसिद्ध जोडप्यांच्या यादीत असलेला अभिनेता इम्रान खान आणि पत्नी अवंतिका मलिकच्या दुराव्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी ते एकमेकांपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण त्यांच्या विभक्त होण्याचे कारण मात्र समोर आले नव्हते. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे अद्यापही वेगवेगळे राहत आहेत. अवंतिकाने आपल्या मुलीसोबत इम्रानचे घर सोडले आहे. त्यानंतर ते दोघेही प्रसारमाध्यमांपासून दूर राहत होते. त्यांच्या नात्याबद्दल ते गोपनियता बाळगून आहेत. या चर्चांदरम्यान इमरानच्या सासूने यासर्व अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता मात्र या जोडप्यातील दुराव्याचं कारण इमरानचं अपयश असल्याचं समोर येतंय.  

'पिंकव्हिला'नं दिलेल्या माहितीनुसार, अभिनय क्षेत्रात इम्रानच्या पदरी यशापेक्षा अपयशच अधिक पडलंय. 'कट्टी बट्टी' चित्रटाच्या अपयशानंतर त्याच्या वाट्याला फार चित्रपट आले नाहीत. एक अशी वेळ होती की त्याच्याकडे कामदेखील नव्हते. तब्बल चार वर्ष त्याच्या हातात कोणताही चित्रपट नव्हता. 

अखेर दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावण्याचाही त्यानं प्रयत्न केला. परंतु त्याचा हा प्रयत्नदेखील फोल ठरला. त्याच्या वाट्याला कायम निराशाच लागत होती. सतत अपयशाला सामोरं जावं लागल्यानं इम्रानची चिडचिडही वाढली होती. त्याचे सर्व जमा पैसेही खर्च झाले होते. त्यामुळेच अवंतिका आणि इम्रानमध्ये रोज वाद होत होते. अखेर या वादाला कंटाळून त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रोजच्या भांडणाचा मुलीवर होत असलेला प्रभाव पाहता अवंतिकाने इम्रानच्या घरातून काढता पाय घेतला. २०११ साली इम्रान-अवंतिका विवाह बंधनात अडकले होते.