Independence Day 2023 Movie : एखादा खास दिवस असल्यास कलाजगतही आपल्या परीनं त्या दिवसाचं औचित्य साधत काही उपक्रम राबवताना दिसतं. 15 ऑगस्ट अर्थात देशाचा स्वातंत्र्य दिन त्यापैकीच एक. या दिवशी अनेक वाहिन्यांवर देशाशी संबंधित काही चित्रपट दाखवण्यात येतील. आता या चित्रपटांची यादी तुम्हालाही तोंडपाठ झाली असेल. याच यादीत एक असा चित्रपटही आहे जो बॉक्स ऑफिसवर (Box Office) फार चालला नाही. पण, या चित्रपटाची लोकप्रियता मात्र आजही कायम आहे. तो चित्रपट म्हणजे 'स्वदेस' (Swades).
आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'स्वदेस' या चित्रपटानं अनेकांच्या काळजाचा ठाव घेतला. काहींचे डोळेही पाणावले. शाहरुख खाननं साकारलेली मोहन भार्गव या अनिवासी भारतीय शास्त्रज्ञाची भूमिका सिनेरसिकांना भावली. फक्त हीच भूमिका नव्हे, तर चित्रपटातील सहाय्यक कलाकारांनीही आपलं स्थान चाहत्यांच्या मनात कायम केलं. इतकं की आजही या चित्रपटाला पाहणारे अनेकजण असतील. भारतापासून दूर असणारा एक तरुण शास्त्रज्ञ मायदेशी परततो. पण, इथं येताच ज्या देशातील परिस्थितीला तो नावं ठेवताना दिसतो तो इथली परिस्थिती बदलण्यासाठी आपलं योगदान कसं देतो, देशाशी असणारं नातं पुन्हा नव्यानं कसं जगतो याचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं आहे. वास्तवाचा चेहरा पाहताना या चित्रपटानं अनेकांना खडबडून जागंही केलं आहे.
एकिकडे चित्रपट विक्रमी कमाई करू शकला नाही. पण, शाहरुख आणि आशुतोश गोवारिकर या दोघांच्याही कारकिर्दीतील उत्तम कलाकृती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आश्चर्याची बाब म्हणजे हा चित्रपट 90 च्या दशकात आलेल्या एका मालिकेवरच आधारित आहे. Love Stories नावाच्या या मालिकेचा 'वापसी' हा भाग पाहताना तुम्हालाही शाहरुखचा Swades आठवल्यावाचून राहणार नाही. बरं इथं पात्र, त्यांची नावं आणि कथानकही तेच. विश्वास बसत नाहीये? पाहा त्या मालिकेतील एका भागाची झलक...
90 च्या त्या मालिकेच्या एका भागासाठी खुद्द आशुतोष गोवारिकरनंच 'मोहन'चं पात्र साकारलं होतं. तर, 'कावेरी अम्मा' हे पात्रही किशोरी बल्लाळ यांनीच साकारलं होतं. ज्यांनी चित्रपटात शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केली होती. यंदाच्या वर्षीही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कोणत्यातरी वाहिनीवर 'स्वदेस' चित्रपट नक्की लागेल. त्यानिमित्तानं तो चित्रपटही पाहा, मालिकेच्या भागाशी त्याचं असणारं साधर्म्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल.