Jawan Box Office Collection Day 1: शाहरुख खानच्या जवानने पहिल्याच दिवशी किती कमाई केली? असा प्रश्न काल रात्रीपासून म्हणजेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांपासून विचारत आहेत. जवानने जागतिक स्तरावर किती कमाई केली? याबद्दलही अनेकांमध्ये उत्सुकता आहे. असं असतानाच आता जवानच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली असून ही आकडेवारी खरोखरच थक्क करणारी आहे. शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतूपती, प्रिया मणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, लहर खान आणि संजय दत्तच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धुमाकूळ घातला आहे. आकडेवारीकडे पाहिल्यास शाहरुख खानच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींची गल्ला जमल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 10 चित्रपटांचा विक्रम मोडीत काढला आहे.
चित्रपट व्यवसायासंदर्भातील तज्ज्ञ असलेल्या मनोबाला विजयबालन यांनी जवानने जागतिक स्तरावर केलेल्या कमाईबद्दल एक्सवरुन म्हणजेच ट्वीटरवरुन एक पोस्ट केली आहे. "जवान हा प्रदर्शनाच्या दिवशीच सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडमधील चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार देशामध्ये चित्रपट 70 कोटींची कमाई करेल. जागतिक स्तरावर चित्रपटाची कमाई 120 कोटी असेल. तसेच शाहरुख हा पहिलाच हिंदी अभिनेता आहे ज्याच्या 2 चित्रपटांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई केली आहे," असं विजयबालन यांनी म्हटलं आहे.
मनोबाला यांनी जवानने विक्रम मोडलेल्या 10 चित्रपटांचाही उल्लेख केला आहे. पठाण चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी 57 कोटींची कमाई केलेली. त्यानंतर केजीएफ चॅप्टर टूने 53.95 कोटींची कमाई केलेली. वॉरने 53.35 कोटींची कमाई केली होती. ठग्स ऑफ हिंदोस्तानने 52.25 कोटींची कमाई केलेली. हॅपी न्यू इयरने 44.97 कोटींची कमाई केली होती. भारतने 42.30 कोटींची, बाहुबली-2 ने 41 कोटी, प्रेम रतन धन पायो ने 40.35 कोटी आणि गदर 2 ने 40.10 कोटींची कमाई केली होती. त्याचप्रमाणे 36.54 कोटी कमाई करत या यादीत सुल्तान टॉप 10 मध्ये आहे. या सर्व चित्रपटांना जवानने मागे टाकलं आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी गुरुवारी रात्री केलेल्या पोस्टमध्ये भारतात जवानने किती कमाई केली आहे याची रितसर आकडेवारी पोस्ट केली आहे. जवानने पहिल्या दिवशी राष्ट्रीय स्तरावर रात्री पावणेअकरापर्यंत केलेल्या कमाईपैकी पीव्हीआरच्या चित्रपटगृहांमधून 23.50 कोटी कमवलेत तर सिनेपोलीजमधून 5.90 कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. एकूण 29.40 कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. तर साडेआठपर्यंतच्या आकडेवारीनुसार मु्व्ही मॅक्सच्या माध्यमातून 90 लाखांची कमाई या चित्रपटाने केली आहे.
जवान चित्रपटाच्या माध्यमातून अटली कुमार या दाक्षिणात्य दिग्दर्शकाने बॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री केली असून या चित्रपटासाठी अटलीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. चित्रपटाची क्रेझ इतकी आहे की रिलिजच्या दिवशी पहाटेपासून अगदी मध्यरात्रीनंतरही अनेक चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची गर्द पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी प्रेक्षक तिकीटबारीबाहेर लांबच लांब रांगा लावून उभे असल्याचं दिसून आलं.