मुंबई : आपलं मत स्पष्टपणे मांडणारी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत तिच्या दमदार अभिनयासाठी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. कंगनाच्या चित्रपटांची निवडदेखील चांगली मानली जाते. कंगनाकडे आता बरेच दमदार सिनेमा तिच्या लिस्टमध्ये पडून आहेत. आता अशी बातमी आहे की, कंगना रनौत लवकरच भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून कंगनाला ही भूमिका साकारायची होती. तिचे चाहतेही कित्येक वर्षांपासून तिच्या या प्रोजेक्टबद्दल बरीच चर्चा करीत होते. मात्र आता कंगनाने तिच्या सोशल मीडियावरही याची एक छोटीशी झलक दाखविली आहे.
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही वेळापूर्वी एक स्टोरी पोस्ट केली आहे. जी आता व्हायरल होत आहे. कंगनाने या स्टोरीत सांगितलं आहे की, ती आता तिच्या नवीन सिनेमाच्या तयारीला लागली आहे. तिने लिहिलं आहे की, "विचार करा आता मणिकर्णिका फिल्म्समध्ये काय चाललं आहे?" दुसर्या स्टोरीमध्ये तिनं लिहीलं आहे की, ती इंदिरा गांधींच्या लूकसाठी तिचं शरीर स्कॅन करत आहे.
अलीकडेच या चित्रपटाविषयी बोलताना कंगनाने सांगितलं की, ती लवकरच इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे. पण हा चित्रपट त्यांचा बायोपिक नसेल, हा एक ग्रँड पीरियड ड्रामा सिनेमा असेल. यामध्ये राजकारणाबद्दल बराच ड्रामा असेल. त्याविषयी बोलताना कंगना म्हणाली की, हा चित्रपट पाहणं माझ्या पिढीला सध्याच्या भारतातील सामाजिक-राजकीय परिस्थिती समजण्यास मदत करेल. कंगनाचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याकडे तिच्या चाहत्यांच लक्ष आहे.