टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार भारत

U19 Womens T20 World Cup 2025 : 18 जानेवारी पासून मलेशियाच्या कुआलालंपुरमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडू असलेल्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. 

पुजा पवार | Updated: Dec 24, 2024, 03:05 PM IST
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार भारत title=
(Photo Credit : Social Media)

U19 Womens T20 World Cup 2025 : कुआलालंपुरमध्ये अंडर 19 आशिया कप 2024 (U19 Womens Asia Cup 2024) चे विजेतेपद जिंकून भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. आता भारताच्या अंडर 19 महिला क्रिकेट संघाचं पुढील लक्ष हे जानेवारीत होणारा टी 20 वर्ल्ड कप जिंकणं असणार आहे. 18 जानेवारी पासून मलेशियाच्या कुआलालंपुरमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडू असलेल्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. 

बीसीसीआयच्या महिला निवड समितीने अंडर 19 महिला वर्ल्ड कपसाठी जाणाऱ्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. यंदा संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी निकी प्रसादवर सोपवण्यात आलेली असून सानिका चाळके ही उप कर्णधार असणार आहे. तर विकेटकिपर म्हणून कमलिनी जी आणि भाविका अहिरे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यासोबतच नंदना एस, इरा जे आणि अनादि टी हे तीन स्टँडबाय खेळाडू आहेत. 

अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये 16 देशांचे संघ सहभागी होणार असून यांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. भारत ग्रुप ए मध्ये असून यात मलेशिया, वेस्टइंडीज आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 19 जानेवारी रोजी वेस्ट इंडिज सोबत होणार आहे. त्यानंतर भारताचा सामना हा 21 जानेवारी रोजी मलेशिया आणि 23 जानेवारी रोजी श्रीलंके सोबत होईल. 

हेही वाचा : मुंबईतील 'या' ठिकाणी आहे विनोद कांबळीचं आलिशान घर, किंमत ऐकून घाम फुटेल, पाहा Photos

अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कपमधील ग्रुप स्टेजचे सामने हे 19 ते 23 जानेवारी दरम्यान खेळवले जाणार आहेत. तर ग्रुपमध्ये टॉपवर राहिलेल्या तीन संघांमध्ये 25 आणि 29 जानेवारी  दरम्यान सुपर सिक्स सामने खेळवले जातील. सुपर सिक्समधील विजयी संघांमध्ये सेमी फायनल सामने खेळवले जातील आणि 2 फेब्रुवारी रोजी अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळवला जाईल. 

भारतीय संघ : 

निकी प्रसाद (कर्णधार ), सानिका चाळके (उप-कर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता वीजे, सोनम यादव, पारुनिका सिसौदिया, केसरी द्रिथि, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस