Honey Rose: दाक्षिणात्य अभिनेत्री हनी रोजशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये केरळ पोलिसांच्या विशेष तपास पथकाने बुधवारी मोठ्या उद्योगपतीला ताब्यात घेतलं आहे. याचे नाव बॉबी चेम्मनूर आहे. अभिनेत्री हनी रोजने त्याच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. बॉबी चेम्मनूर हा हनी रोजच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट करत असायचा.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ज्वेलरी व्यावसायिक बॉबी बॉबी चेम्मनूरला वायनाड येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मल्याळम अभिनेत्री हनी रोजच्या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनी रोजचा आरोप काय?
हनी रोज ही मल्याळम इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री नेहमी सक्रिय असते. तिचे लाखो चाहते आहेत. रविवारी अभिनेत्री हनी रोजने फेसबुकवर एका पोस्टमध्ये बॉबी चेम्मनूरवर पाठलाग आणि अश्लील कमेंट केल्याचा आरोप केला. 33 वर्षीय अभिनेत्रीने त्यावेळी कोणाचेही नाव उघड केले नव्हते. हनी रोजने तिच्या तक्रारीत व्यावसायिकावर वारंवार अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांच्या कारवाईवर अभिनेत्रीने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कोण आहे हनी रोज?
हनी रोज ही एक दक्षिण अभिनेत्री आहे, जी प्रामुख्याने मल्याळम चित्रपट उद्योगात काम करते. तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. 2023 मधील ॲक्शन ड्रामा चित्रपट 'वीरा सिम्हा रेड्डी' यामध्ये तिने काम केलं आहे. ज्यामध्ये नंदामुरी बालकृष्ण मुख्य भूमिकेत दिसले होते.
30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अभिनेत्री हनी रोजच्या फेसबुक पोस्टवर इतर अनेकांनी अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केल्याने हे प्रकरण आणखी वाढले आहे. यानंतर अभिनेत्रीला पोलिसांकडे जावे लागले. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, कोच्ची सेंट्रल पोलिसांनी अभिनेत्री हनी रोजच्या तक्रारीवरून आतापर्यंत 30 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तर त्यापैकी एकाला ताब्यात घेतलं आहे.
बॉबी चेम्मनूर हे चेम्मनूर ग्रुपचे चेअरमन आहेत. जे दागिन्यांचा व्यवसाय करणारे मोठे व्यावसायिक आहेत. 2012 मध्ये फुटबॉल दिग्गज डिएगो मॅराडोना केरळमध्ये आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.