मुंबई : बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा नुकताच त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला आहे. या खास प्रसंगी सिद्धार्थच्या चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत. सिद्धार्थचा 37 वा वाढदिवस त्याच्या बाकिच्या वाढदिवसांपेक्षा खूपच खास होता. खरंतर, यावेळी सिद्धार्थला त्याची कथित गर्लफ्रेंड कियारा अडवाणीनेही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कियाराची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल
कियाराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह' चित्रपटावेळचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सिद्धार्थच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. सिद्धार्थसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'माझ्या सगळ्यात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.' यासोबतच तिने हार्ट इमोजीही शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने अभिनेत्यालाही टॅग केलं आहे.
सिद्धार्थला मानते सगळ्यात जवळचा मित्र
सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलत नाहीत. मात्र, दोघंही अनेकदा एकत्र किंवा एकमेकांच्या घराबाहेर स्पॉट झाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्तानेही दोघंही विमानतळावर एकत्र स्पॉट झाले होते. 'शेरशाह' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही कियाराला चित्रपटसृष्टीतील तिची सर्वात जवळची व्यक्ती कोण असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने सिद्धार्थ मल्होत्राचं नाव घेतलं होतं.