मुंबई : प्रसिद्ध कथक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. पंडित बिरजू महाराज यांचं कथक नृत्यामधील योगदान फार मोलाचं आहे. त्यांच्या निधनामुळे कथक कलाकार आणि बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील अनेक गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली आहेत. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचा पाय बिरजू महाराजांच्या इशाऱ्यावर थिरकला.
'मोहे रंग दो लाल'
अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'मोहे रंग दो लाल' हे गाणे पंडित बिरजू महाराज यांनी कोरिओग्राफ केलं. तेव्हा दीपिकाला शास्त्रीय नृत्य करताना पाहून सर्वांनाच धक्का बसला. या गाण्यासाठी दीपिकाचे खूप कौतुक झाले आणि याचे सर्व श्रेय पंडित बिरजू महाराजांना जाते.
'काहे छेड़े मोहे'
माधुरी दीक्षित प्रत्येक वेळी चेहऱ्यावरील हावभावाने चाहत्यांची मने जिंकते. मुळात माधुरी स्वतः कथक डान्सर आहे. देवदास चित्रपटातील 'काहे छेडे मोहे' हे गाणं पंडित बिरजू महाराज यांनी कोरिओग्राफ केले होते. हे गाणे आजही खूप प्रसिद्ध आहे.
'जगावे सारी रैना''
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितला पंडित बिरजू महाराज यांच्यासोबत अनेकदा काम करण्याची संधी मिळाली आहे. माधुरीच्या 'डेढ़ इश्किया' चित्रपटातील 'जगावे सारी रैना' हे गाणेही त्यांनी कोरिओग्राफ केलं.
'उन्नई कनाडू नान'
कमल हसन यांच्या 'विश्वरूपम' चित्रपटातील 'उन्नई कनाडू नान' हे गाणंही पंडित बिरजू महाराज यांनी कोरिओग्राफ केलं. या गाण्यात कमल हसन कथक करताना दिसले. गाण्यातील त्यांचे भाव अतिशय सुंदर होते. पंडित बिरजू महाराजांनी शिकवलेले हावभाव त्यांनी खूप छान पडद्यावर मांडले.