'कच्च्या गुरूचा चेला नाय मी', महिलांसोबत गैरवर्तनाच्या आरोपानंतर किरण मानेंची मोठी प्रतिक्रिया

यामध्ये त्यांनी किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक असल्याचं म्हटलं आहे 

Updated: Jan 16, 2022, 04:03 PM IST
 'कच्च्या गुरूचा चेला नाय मी', महिलांसोबत गैरवर्तनाच्या आरोपानंतर किरण मानेंची मोठी प्रतिक्रिया title=

मुंबई :  सध्या सगळीकडेच एका मराठी मालिकेबाबत चर्चा होत आहे. सध्या अभिनेते किरण माने यांच्या नावाची सर्वात जास्त चर्चा होत आहे. त्यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने वातावरण खूपच तापलं आहे.

अभिनेता किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून तडकाफडकी काढल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.  ते या मालिकेत विलास पाटीलची भूमिका करत होते. 

यानंतर किरण माने यांच्या विरोधात काही आरोप आता निर्मात्यांनी केली आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीने एक निवेदन जारी करत आपली बाजू मांडली आहे, यामध्ये त्यांनी किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक असल्याचं म्हटलं आहे आणि त्यांना मालिकेतून बाहेर काढण्याची काही कारणे सांगितली आहेत.

माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय शोमधील अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः शोच्या महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे होता. या मालिकेतील सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. असं चॅनेलचं म्हणणं आहे.

यावर किरण माने यांची प्रतिक्रिया देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं आपली बाजू मांडली आहे.

किरण माने यांनी लिहिलं आहे की,"आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..... आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत...अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे... करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. 

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "प्रॉडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे... चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते 'सत्य' सांगतीलच !

पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालणारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा ! मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी ! तुका म्हणे रणी...नये पाहो परतोनी !!! "

वाहिनीने आपली भूमिका मांडण्याआधीच किरण माने यांनी आपली पोस्ट शेअर केली होती. त्यांना जणू या सगळ्यांची कल्पना होती.