मुंबई : काही अभिनेत्री या त्यांच्या बहुविध भूमिकांसोबतच त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. फक्त बोल्ड अदाच नव्हे तर, अभिनयाचीही बाजू भक्कम असणाऱ्या अशाच अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे विद्या बालन हिचं. घाबरवणारी 'माँजुलिका' असो किंवा मग रेडिओच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू करणारी 'सुलू' असो. आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेत विद्याने जीव ओतला.
अशा या अभिनेत्रीचा आज वाढदिवस. या खास दिवसाच्या निमित्ताने तिच्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. एका दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेल्या विद्या बालन हिने सातवी इयत्तेत असताना अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला 'एक दो तीन' या गाण्यावर ठेका धरताना पाहिलं. तेव्हाच तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला जो कुणीही बदलू शकलं नाही.
सध्या ती यशाच्या शिखरावर असली तरीही, इथवर पोहोचण्याचा तिचा प्रवास काही फारसा सोपा नव्हता. 'हम पाँच' या कार्यक्रमातून तिने या जगतात पाऊल टाकलं. पण, तिने साकारलेली 'राधिका माथूर' फारशी लोकप्रिय होऊ शकली नाही. दरम्यान विद्याला कामही मिळेनासं झालं. असं म्हटलं जातं की, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तर तिला अपशकुनी म्हणत विचित्र कारणावरुन हिणवण्यातही आलं होतं. हे सारं सुरु असतानाच विद्याच्या वाट्याला आला 'परिणिता' हा चित्रपट. ज्यामुळे गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली.
एका मुलाखतीतच विद्याने एका प्रसंगाचा उलगडा केला होता. चित्रपट जगतात सुरुवात केल्यानंतर संघर्षाच्या काळात दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत एका मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी विद्याला मिळाली होती. पण, काही कारणास्तव या चित्रपटाची गाडी पुढे गेली नाही. काम ठप्प झालं. तेव्हा अनेकांनी विद्याला अपशकुनी म्हणूनही हिणवलं. बरं हे प्रकरण इथेच थांबलं नाही तर, याचवेळी तिची जन्मवेळही मागवण्यात आली होती.
संघर्षाचा हा काळ ओलांडणाऱ्या विद्याने आतापर्यंत बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलं आहे. पण, तिच्या जीवनाला कलाटणी दिली ती म्हणजे 'परिणिता'ने. 'द डर्टी पिक्चर', 'भुल भूलैय्या', 'कहानी', 'तुम्हारी सुलू' या चित्रपटांतून तिने आपली विशेष छाप या कलाविश्वात सोडली. अनेक पुरस्कारांसह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण असणारी विद्या बालन ही तिच्या अनोख्या अंदाजासाठीही ओळखली जाते. जवळपास १८८ कोटींच्या संपत्तीची मालकी तिच्याकडे असल्याचं म्हटलं जातं. कठिण परिस्थिती, आव्हानं यातून वाट काढत स्वत:चं अस्तित्व विद्याने तयार केलं आणि मोठ्या ताकदीने ते टिकवून ही ठेवलं. अशा या अभिनेत्रीला कलाविश्वातील तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.