लेकीच्या फेक अकाऊंटमुळे महेश बाबू टेन्शनमध्ये, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

महेश बाबूची लेक सिताराच्या नावाने फेक सोशल मीडिया अकाऊंट बनवण्यात आले आहे. याबद्दल त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

Updated: Feb 10, 2024, 05:13 PM IST
लेकीच्या फेक अकाऊंटमुळे महेश बाबू टेन्शनमध्ये, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन title=

Mahesh Babu Daughter Sitara Ghattamaneni Fake Account : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी महेश बाबूची लेक सितारा एका जाहिरातीच्या निमित्ताने न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर झळकली. आता ती एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे. महेश बाबूची लेक सिताराच्या नावाने फेक सोशल मीडिया अकाऊंट बनवण्यात आले आहे. आता याबद्दल महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

अभिनेत्री नम्रता शिरोडकरने दोन दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिची लेक सिताराच्या नावाचा वापर करुन फेक अकाऊंट बनवण्यात आले आहे. याद्वारे काही फॉलोअर्सला लिंक पाठवून त्यात गुंतवणूक करण्यासाठी सांगितले जात आहे. आता याबद्दल नम्रता शिरोडकरसह महेश बाबूच्या प्रोडक्शन हाऊसने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. 

महेश बाबूने चाहत्यांना केलं आवाहन

आमची मुलगी सितारा हिच्या नावाने इन्स्टाग्रामवर एक फेक अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. या अकाऊंटद्वारे काही फॉलोअर्सला गुंतवणूक करण्यासाठी लिंक पाठवली जात आहे. आम्ही याबद्दल माधापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस फेक अकाऊंट सुरु करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. आम्ही आमच्या चाहत्यांना विनंती करु इच्छितो की कोणत्याही कलाकाराच्या अकाऊंटवरुन आलेल्या मेसेजची खात्री करुनच त्यावर आर्थिक व्यवहार करावेत, अशी पोस्ट नम्रता शिरोडकरने केली आहे. 
 
सिताराचे sitargadtamaneni या नावाने एकमेव अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. त्यामुळे या अकाऊंट व्यतिरिक्त इतर कोणत्याही अकाऊंटवर विश्वास ठेवू नये, असेही यात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान महेश बाबूची लेक सितारा ११ वर्षांची आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका ज्वेलरी ब्रँडसाठी अॅम्बेसिडर म्हणून काम केले होते. तिच्या या जाहिरातीची झलक टाइम स्क्वेअरवर दाखवण्यात आली होती. या जाहिरातीत तिने डिझाईनर ड्रेस आणि साडी परिधान केली होती. यावर तिने भारतीय पद्धतीचे दागिने परिधान केले होते. या जाहिरातीसाठी तिने एक कोटी रुपये मानधन घेतले होते. विशेष म्हणजे तिने हे मानधन एका चॅरिटीला दान म्हणून दिले होते. तिच्या या निर्णयानंतर तिचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळाले. सितारा टाइम स्क्वेअरवर झळकणारी पहिली भारतीय स्टारकिड ठरली आहे.