close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'बाहुबली'मागोमाग आणखी एका चित्रपटाची धमाकेदार कमाई पाहून व्हाल थक्क

कमाईचे आकडे सुस्साट.... 

Updated: Jun 5, 2019, 01:37 PM IST
'बाहुबली'मागोमाग आणखी एका चित्रपटाची धमाकेदार कमाई पाहून व्हाल थक्क
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं एक असं साधन आहे, जे काळानुरुप बदलत आलं आणि विविध विक्रमही प्रस्थापित करत आलं. तगडे कलाकार, ताकदीचं कथानक, अतिभव्य सेट यांच्या बळावर असे काही अफलातून चित्रपट साकारण्यात येतात ज्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आपोआपच उत्स्फूर्त दाद दिली जाते. सध्या प्रेक्षक आणि संपूर्ण कलाविश्वात अशी पसंती मिळत आहे ती म्हणजे सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'ल्यूसिफर' या चित्रपटाला. 

अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. त्याच्या दिग्दर्शनात साकाणाऱ्या या चित्रपटाची सुरुवातीपासूनच चर्चा होती. त्यामागचं कारणही स्पष्ट होतं. दाक्षिणात्य कलाविश्वात आपली छाप पाडणाऱ्या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा 'ल्यूसिफर'मधील अंदाज हा तरुणाईलाही लाजवेल असाच आहे. अशा या चित्रपटाच्या कमाईने विक्रमी आकडा गाठला आहे. 

२०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आता 'ल्यूसिफर'चाही समावेश झाला आहे. 'मनोरमा'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाची आतापर्यंतची बॉक्स ऑफिस कमाई ही १७५ कोटींहून जास्त आहे. जवळपास १३ कोटी रुपयांचा नफा या चित्रपटाच्या डिजिटल हक्कांमुळे झाला आहे. तर, त्याचे उपग्रह हक्क हे ६ कोटींना विकले गेले. विविध भाषांसाठीचे टीव्ही हक्क विकून या चित्रपटाच्या कमाईत १० कोटींची भर पडली. ही एकूण रक्कम पाहता, हा आकडा २०० कोटींच्याही पलीकडे जात आहे. त्यामुळे ही चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वाची आणि विक्रमी बाब ठरत आहे. 'बाहुबली' या दाक्षिणात्य चित्रपटामागोमाग धमाकेदार कमाईमुळे 'ल्यूसिफर' प्रकाशझोतात आहे. 

 
 
 
 

A post shared by Mohanlal (@mohanlal) on

मल्याळम चित्रपटविश्वातही 'ल्यूसिफर'चं हे यश खऱ्या अर्थाने प्रशंसनीय ठरत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये मोहनलाल यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'पुलीमुरुगन' आणि निवीन पॉलीची मुख्य भूमिका असणाऱ्या 'कायमकुलम कोचूण्णी' या चित्रपटांचा या यादीत समावेश होता. 

मोहनलाल यांच्या 'ल्यूसिफर'मध्ये विवेक ओबेरॉय, तोविनो थॉमस, इंद्रजीत, मंजू वारियर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने पृथ्वीराजने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पणही केलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा पदार्पणातील चित्रपट त्याच्यासाठी भाग्याची साथ घेऊन आला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.