'माझ्या मुलीने अशी बातमी वाचली आणि...'; मृत्यूच्या अफवेबद्दल बोलताना मराठी अभिनेता भावुक

Marathi Actor Death Viral News: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर हा मराठमोळा अभिनेता व्यक्त झाला आहे.

Updated: Aug 21, 2024, 09:03 AM IST
'माझ्या मुलीने अशी बातमी वाचली आणि...'; मृत्यूच्या अफवेबद्दल बोलताना मराठी अभिनेता भावुक title=
आठ महिन्यांपूर्वी त्याला आलेला हृदयविकाराचा झटका (फोटो - इन्स्टाग्रामवरुन साभार)

Marathi Actor Death Viral News:​ मराठीबरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही आपल्या कामाची छाप सोडणारा मराठमोळा कलाकार श्रेयस तळपदेच्या मृत्यू झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर यासंदर्भातील काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. नेटकऱ्यांमध्ये या पोस्टची चर्चा असतानाच स्वत: श्रेयसने या अफवांवर भाष्य केलं आहे. श्रेयसने या अशा अफवांचा कुटुंबावर कसा परिणाम होतो याबद्दल 'झूम'शी बोलताना भाष्य केलं आहे.

व्हायरल झाली पोस्ट

श्रेयसचा मृत्यू झाल्याचा दावा करणारी एक पोस्ट 19 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. 'इक्बाल', 'गोलमाल', 'ओम शांती ओम'सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या श्रेयसच्या या कथित मृत्यूसंदर्भात सोशल मीडियावर जोरादार चर्चा झाली. ही पोस्ट श्रेयसपर्यंतही पोहोचल्याने त्याने मंगळवारी सोशल मीडियावरुन स्पष्टीकरण दिलं. मात्र त्यापूर्वी त्याने 'झूम'शी बोलताना या प्रकरणावरुन नाराजी व्यक्त केली.

मी या पोस्टकडे दुर्लक्ष केलं पण...

"हे फारच दुर्देवी आहे की कोणाला तरी माझ्या आरोग्यासंदर्भातील अफवा पसरवून त्यामधून विनोद निर्मिती कारवी लागत आहे. विशेष करुन माझ्या आरोग्यविषयक घडामोडींची कल्पना असताना हे केलं गेलं. माझी मुलगी शाळेत जाते. तिने असली बातमी वाचली आणि त्याचा तिच्यावर परिणाम झाला तर? मी सायंकाळी ही पोस्ट पाहून त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र माझ्या अनेक हितचिंतकाचे मला फोन येऊन गेले. त्यामुळेच मी यासंदर्भात उद्या एक निवेदन जारी करेल," असं भावुक विधान श्रेयसने सोमवारी केलं होतं. त्याप्रमाणे श्रेयसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केलेली. 

...अशी माझी इच्छा नाही

"मात्र मी माझ्या आरोग्यासंदर्भात सर्वकाही ठिक असल्याची पोस्ट शेअर करेन आणि त्यानंतर खोटी बातमी शेअर करणारा अधिक प्रसिद्ध होईल. त्यानंतर अचानक तो 'बिग बॉस'मध्ये दिसेल. हे असं काही व्हावं अशी माझी इच्छा नाही. माझी चिंता व्यक्त करणाऱ्यांचे आभार मानतो. अपेक्षा आहे लोकांना याची जाणीव होईल की सोशल मीडियावर जे काही पोस्ट केलं जातं ते चांगल्या हेतूने होत नाही. या माध्यमाचा अधिक चांगला वापर केला पाहिजे," असं श्रेयस म्हणाला.

श्रेयसने मंगळवारी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपल्या मृत्यूसंदर्भातील अफवांचा कुटुंबावर फार मोठा परिणाम होतो असं म्हटलं होतं. त्याने अशापद्धतीच्या पोस्टवरुन ट्रोलर्सवर निशाणा साधलेला.

आलेला हृदयविकाराचा झटका

14 डिसेंबर 2023 रोजी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान हा प्रकार घडला होता. त्यानंतर त्याच्या हृदयावर एंजिओप्लास्टी करण्यात आली.