'द्वेष भडकावण्याचं...', इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्या बॉडीगार्डच्या मुलाचा कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर आक्षेप, 'शिखांना...'

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' चित्रपट रिलीजआधीच वादात अडकला आहे. फरीदकोटचे अपक्ष खासदार सरबजीत सिंह यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात शीख समजाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 20, 2024, 08:13 PM IST
'द्वेष भडकावण्याचं...', इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्या बॉडीगार्डच्या मुलाचा कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर आक्षेप, 'शिखांना...' title=

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' चित्रपट रिलीजआधीच वादात अडकला आहे. फरीदकोटचे अपक्ष खासदार सरबजीत सिंह यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. सरबजीत सिंह यांनी फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटात शीख समजाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे. यामुळे शीख समाजाच्या अडचणी वाढू शकतात असा दावाही त्यांनी केला आहे. 

सरबजीत यांची फेसबुक पोस्ट

सरबजीत सिंह खालसा यांनी लिहिलं आहे की, "रिपोर्ट्सनुसार इर्मजन्सी चित्रपटात शिखांचं चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आलं आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती आहे. जर शिखांना चित्रपटात फुटीरवादी किंवा दहशतवाद्यांच्या रुपात दाखवलं गेलं असेल तर हा मोठा कट आहे. हा चित्रपट शिखांप्रती दुसऱ्या देशांमध्ये द्वेष पसरवणारा घटक असून, सरकारने याकडे लक्ष देत त्यांना रोखलं पाहिजे".

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "देशात शिखांवर द्वेषातून होणाऱ्या हल्ल्यांच्या बातम्या अनेकदा समोर येत असतात. अशात हा चित्रपट शिखांप्रती द्वेष भडकावण्याचं काम करु शकतो. शिख समाजाने देशासाठी मोठं बलिदान दिलं आहे, जे चित्रपटात योग्य पद्धतीने दाखवण्यात आलेलं नाही. पण शिखांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक समरसता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची अशा आक्षेपार्ह चित्रपट आणि गाण्यांवर बंदी घातली पाहिजे. मी नेहमीच समाजात शांतता कायम ठेवण्यासाठी अशा असामाजिक गोष्टींविरोधात आवाज उठवणार".

कोण आहे सरबजीत सिंह खालसा?

सरबजीत सिंह खालसा हे बेअंत सिंह यांचे चिरंजीव आहेत. बेअंत सिंह त्या दोन बॉडीगार्ड्सपैकी आहेत ज्यांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी ऑपरेशन ब्ल्यू स्टारमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची गोळ्या घालून हत्या केली होती. 

कंगना रणौतने 'इमर्जन्सी' चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी भारतात लागू केलेल्या आणीबाणीचा काळ, इंदिराजींचा संघर्ष आणि त्यांची हत्या हे सर्व चित्रपटात दाखवलं जाणार आहे. अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, विशाक नायर यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही यात महत्त्वाची भूमिका आहे.