Kushal Badrike Mumbai Local Travelling Experience : मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे त्यांच्या संघर्षाच्या काळात लोकल ट्रेनने प्रवास करायचे. शूटींगचे ठिकाण लांब असल्याने आणि खिशात पुरेसे पैसे नसल्याने अनेक कलाकारांना धक्काबुक्की करत ट्रेनचा प्रवास करावा लागत असे. याबद्दल अनेकांनी विविध अनुभवही शेअर केले आहेत. त्यानंतर आता एका प्रसिद्ध अभिनेत्याने लोकल ट्रेनच्या प्रवासाची खास आठवण सांगितली आहे.
‘चला हवा येऊ द्या’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके हा सतत चर्चेत असतो. कुशलने त्याच्या अभिनयाने आणि विनोदी शैलीनं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग पाहायला मिळतो. आता सध्या कुशल बद्रिके हा मॅडनेस मचाएंगे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
"सुरवातीच्या काळात मी ट्रेनने भरपूर प्रवास केला. तिथले पाळायचे नियम आणि टाळायचे नियम मला ट्रेन्सच्या टाईमटेबल सारखेच पाठ होते. ट्रेन मधे भजनात रमणारे दर्दी पाहिले, तशीच डब्यातली गुंडा-गर्दी पाहिली. काळ्या कोटाची भीती त्या प्रवासात जी मनात भरली ती पुढे आयुष्याच्या प्रवासात कायम राहिली. “बकासुरा सारखी माणसांचे लोंढे गिळणारी ही ट्रेन, कुठेतरी जाऊन पुन्हा माणसं ओकते.” असले भयंकर विचार तेंव्हा मनात यायचे.
आपली ट्रेन सुटू नये म्हणून रोज धावपळ करणाऱ्या मला; ही ट्रेन एकदाची कायमची सुटावी असं वाटत रहायचं. आता ट्रेन कायमची सुटली… पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्या सारखं झालंय, ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर उतरून निघून जातात, सहप्रवासी बदलत राहतात, “प्रवास” मात्र कायम असतो !! :- सुकून", असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.
कुशलच्या या पोस्टवर त्याची पत्नी सुकन्याने कमेंट केली आहे. ”ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर उतरून निघून जातात. सहप्रवासी बदलत रहातात.” असे सुकन्याने म्हटले आहे. त्यासोबतच कुशलच्या या पोस्टवर अनेक चाहतेही कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी त्याची ही पोस्ट आवडल्याचेही कमेंट करत सांगितले आहे.
दरम्यान कुशल बद्रिके हा सध्या मॅडनेस मचाएंगे या कार्यक्रमात झळकत आहेत. या कार्यक्रमात मराठमोळी हेमांगी कवी आणि फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरेदेखील आहे. कुशलने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘पांडू हवालदार’, ‘बाप माणूस’, ‘स्लॅम बुक’, ‘रावरंभ’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.